३७ सहस्र रुपयांचा दंड वसूल !
नागपूर – शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. असे असतांना शहरातील विविध भागांतील विवाह समारंभात वर्हाडाच्या झालेल्या गर्दीमुळे महापालिकेच्या ‘उपद्रवी शोध पथका’ने १६ फेब्रुवारी या दिवशी ८ मंगल कार्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून ३७ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला. एकीकडे विवाह समारंभाचा आनंद साजरा केला जात असतांना मंगलाष्टके आटोपताच ‘लोकांना गर्दी करू नका, मुखपट्टी, सॅनिटायझर लावा’ अशा सूचना दिल्या जात होत्या.
२ दिवस आधी महापालिकेने मंगल कार्यालये आणि लॉनला विवाह समारंभासाठी लागू केलेल्या नियमावलीचे पालन करण्याचे निर्देश दिले होते; मात्र अनेक मंगल कार्यालयात उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेच्या ‘उपद्रवी शोध पथका’ने शहरातील लक्ष्मीनगर झोनमधील पराते सभागृह, राधे मंगलम सभागृह, गोल्डन लिफ लॉन, साईबाबा सभागृह, धरमपेठ झोनमध्ये कुसुमताई वानखेडे सभागृह, नेहरूनगर झोनमधील जट्टेवार मंगल कार्यालय, तसेच सतरंजीपुरामधील प्रीतम सभागृह, अशा ८ कार्यालयांवर कारवाई केली.