नम्र स्वभाव आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती उत्कट भाव असलेले गोवा येथील डॉ. मनोज सोलंकी !

नम्र स्वभाव आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती उत्कट भाव असलेले अन् स्वतःचा व्यवसाय साधना म्हणून करणारे मडगाव, गोवा येथील ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे डॉ. मनोज सोलंकी !

‘एकदा मी मडगाव, गोवा येथील डॉ. मनोज सोलंकी यांच्या चिकित्सालयात गेले होतेे. त्या वेळी त्यांच्याशी झालेल्या संभाषणातून त्यांचा साधेपणा, त्यांच्यातील नम्रता आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती त्यांच्या मनात असलेला उत्कट भाव माझ्या लक्षात आला. त्याविषयीची सूत्रे पुढे देत आहे.

डॉ. मनोज सोलंकी

१. डॉ. मनोज सोलंकी यांच्या चिकित्सालयातील श्रीकृष्णाच्या चित्रात आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात पालट झाल्याचे लक्षात येऊन त्याविषयी डॉ. सोलंकी यांना सांगितल्यावर त्यांनी नम्रपणे ‘मला यातले काही कळत नाही’, असे सांगणे

डॉ. मनोज सोलंकी यांच्या चिकित्सालयात गेल्यावर तेथील श्रीकृष्णाच्या चित्रात आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात मला पालट झालेले आढळले. ते पाहून मला आनंद जाणवू लागला. श्रीकृष्णाच्या चित्रात गुलाबी छटा वाढलेली दिसून त्याचे रूप मारक झाल्याचे जाणवले, तर प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राला पांढरी छटा आल्याचे दिसून ते बोलके आणि सजीव झाल्यासारखे वाटले. त्यांच्या प्रभावळीतही पालट जाणवत होता. मी डॉ. सोलंकी यांना त्याविषयी सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मला विशेष काही कळत नाही आणि सूक्ष्मातले तर काहीच कळत नाही.’’ त्यांच्या या बोलण्यातून त्यांची नम्रता आणि मनाचा सरळपणा यांची पोचपावतीच आम्हाला मिळाली. खरेतर ‘हे पालट कुणाही साधकाला सहज कळतील’, असे आहेत.

२. डॉ. सोलंकी यांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या आठवणीतून उलगडलेला त्यांचा साधनाप्रवास

सौ. ज्योती कांबळे

२ अ. आरंभी चिकित्सालयात परात्पर गुरु डॉक्टर अनेक वेळा आलेले असणे, त्यांच्यामुळे घरातील सर्वांना चैतन्य मिळणे आणि त्यांनी सत्संग अन् सेवा यांद्वारे साधनेत टिकवून ठेवून कौटुंबिक समस्यांतून अलगद बाहेर काढणे : नंतर त्यांनी भावसत्संगाच्या रूपात आम्हाला स्वतःचा साधनाप्रवास सांगितला. ते म्हणाले, ‘‘या चिकित्सालयात परात्पर गुरु डॉक्टर अनेक वेळा येऊन गेले आहेत. येथे अनेक संतही येतात. त्यामुळे मला चैतन्य मिळते. हे सर्व माझ्या गुरुमाऊलीचेच नियोजन आहे. आरंभीच्या काळात परात्पर गुरु डॉक्टर माझ्याकडे आठवड्यातून २ वेळा यायचे. त्यांच्या येण्यामुळे ‘मी आणि माझे कुटुंबीय यांना किती चैतन्य मिळत होते ?’, हे मला तेव्हा कळत नव्हते. आता त्याची जाणीव होऊन कृतज्ञता वाटते. माझ्या घरातील सर्वांना आध्यात्मिक त्रास आहे. गुरुदेव मला सत्संगांना आणि सेवेला घेऊन जायचे. त्यांच्या सान्निध्यात राहिल्याने मला साधना कळली आणि मी साधनेत स्थिरावलो. नाहीतर आजचा ‘मी’ दिसलोच नसतो. कौटुंबिक अडचणीत गुरफटलेल्या मला देवाने अलगद बाहेर काढून अनेक अनुभूतीही दिल्या.

२ आ. परात्पर गुरु डॉक्टरांविषयी बोलतांना डॉ. सोलंकी यांची भावजागृती होणे : माझ्याकडे परात्पर गुरुमाऊलींच्या स्पर्शाने भारित झालेले एक लाकडी पटल आहे. अजूनही त्या पटलाला दैवी सुगंध येतो. एखादी सेवा मनापासून स्वीकारली, तर सेवेचे पुढचे सर्व नियोजन गुरुमाऊलीने करून ठेवलेलेच असते. मी केवळ निमित्तमात्र म्हणून त्या सेवेत सहभागी असतो. अनेक प्रसंगांतून हे माझ्या लक्षात आले आहे. ते माझ्यावर अखंड कृपा करतात.’’ हे सांगत असतांना त्यांच्या बोलण्यात सहजता होती. ‘त्यांचा तोंडवळा आणि डोळे यांतून गुरुमाऊलीप्रती भाव व्यक्त होत होता. गुरुमाऊलीचे नाव घेतले, तरी त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावत होत्या आणि ते पाहिल्यावर माझीही भावजागृती झाली.

२ इ. व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत काहीतरी न्यूनता जाणवणे आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे साधनेचे प्रयत्न ऐकल्यावर ४ – ५ वर्षे सवलत न घेता साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करणे : डॉ. सोलंकी म्हणाले, ‘‘मी सत्रे आणि व्यष्टी साधनेचे लिखाण करायचो, तरीही ‘मी करत असलेल्या प्रयत्नांत काहीतरी कमी आहे’, असे मला नेहमी वाटायचे. परात्पर गुरु डॉक्टर नेहमी म्हणायचे, ‘‘सद्गुरु राजेंद्रदादा व्यष्टी आणि समष्टी साधना या दोन्हींची घडी अचूक बसवतात. समष्टीतील चुका आणि व्यष्टीतील प्रायश्‍चित्त यांची ते अचूक सांगड घालतात; म्हणून त्यांचा वेळ कोठेही वाया जात नाही.’’ हे ऐकल्यावर मीही तसे प्रयत्न चिकाटीने चालू केले. ४ – ५ वर्षे जराही सवलत न घेता मी व्यष्टी साधनेचे प्रयत्न प्रामाणिकपणे केले. त्यानंतर माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित झाले.

२ ई. शब्दांशब्दांतून व्यक्त होत असलेला परात्पर गुरुदेवांविषयीचा अपार कृतज्ञतेचा भाव ! : माझ्या जीवनात परात्पर गुरुदेव आले नसते, तर मी अनावश्यक विचार करून वेडा झालो असतो. प्रत्येक क्षणी मला वाटते, ‘माझे जे काही चालले आहे, त्याचे सर्व श्रेय गुरुदेवांकडेच जाते.’ ‘मी सनातन संस्थेत आल्यापासून आतापर्यंत काय सेवा केली ?’, हे मागे वळून पहातो, तेव्हा साधना प्रवासाच्या या वाटेवर मला दिसते, ‘ती केवळ माझी गुरुमाऊली !’’ त्यांचे हे भावोत्कट बोलणे ऐकून ‘ते परात्पर गुरुमाऊलीशी पूर्णपणे समरस झाले आहेत आणि सतत गुरुमाऊलीच्या अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवले. त्यांची उत्कट भावावस्था पाहून माझाही भाव जागृत झाला अन् नकळत आमचे हात श्रीकृष्णाच्या चरणी जोडले गेले.

‘हे गुरुराया, डॉ. मनोज सोलंकी यांची भेट घडवून आणून आम्हाला हा भावसत्संग देणे, हे तुमचेच नियोजन होते. त्यासाठी मी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– सौ. ज्योती कांबळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.४.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक