(म्हणे) ‘जनता प्रत्युत्तर देणार !’- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी

राजू शेट्टी

इंदापूर – देहलीतील आंदोलन देशातील ८० कोटी शेतकर्‍यांचे आहे. मात्र केंद्र सरकार हे आंदोलन मूठभर शेतकर्‍यांचे आणि दलालांचे असल्याचे सांगत आहे. त्यामुळे अहिंसेच्या मार्गाने जनता सरकारला प्रत्युत्तर देईल, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी इंदापूर येथे पत्रकार वार्तालापात व्यक्त केले. शेतकरी देशद्रोही नसून केंद्र सरकारच देशद्रोही आहे. तसेच ‘सेलिब्रिटी’ सरकारी मदत, अनुदान घेतात. त्यांना जनतेने मोठे केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून देशभक्ती शिकण्याची आम्हाला आवश्यकता नाही असे ते म्हणाले. दळणवळण बंदीच्या काळातील ४ मास घरांमध्ये असल्याने रोजगार बुडाला म्हणून अशांचे वीजदेयक माफ करावे अशी मागणी त्यांनी केली. ते इंदापूर येथील न्यायालयात वर्ष २०१३ मधील खटल्याच्या सुनावणीसाठी आले होते. (केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात काळे काय आहे ?, असे सरकारने वारंवार विचारले असूनही त्याचे उत्तर दिले जात नाही. या आंदोलनाला नेमके कुणाचे आणि का समर्थन आहे ?, हे आता जनतेच्या लक्षात आलेले आहे. – संपादक)