शिवछत्रपतींचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी दुर्ग महासंघाची स्थापना करणार ! – छत्रपती संभाजीराजे भोसले, खासदार

खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

कोल्हापूर – शिवछत्रपतींचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी दुर्ग महासंघाची स्थापना  करण्यात येणार आहे. या माध्यमातून केंद्र आणि राज्य पुरातत्त्व खात्याशी दुर्ग संस्थांचे सामंजस्य करार करून गड-किल्ल्यांच्या संवर्धनाला हातभार लावला जाणार आहे, अशी माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिली. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने खासदार संभाजीराजे भोसले यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त दुर्गपरिषद झाली. त्या वेळी ते बोलत होते. मेन राजाराम हायस्कूलमध्ये ही परिषद झाली.

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन यांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना व्हावी, राज्यातील सर्व विद्यापिठांसह शालेयस्तरावर गड-किल्ल्यांच्या जतन संवर्धनाचा अभ्यासक्रम चालू व्हावा, ज्या किल्ल्यांची नोंद पुरातत्त्व विभागाकडे नाहीत, त्यांची नोंद राज्य पुरातत्त्व विभागाकडे करावी, वासोट्याच्या धर्तीवर राज्यातील सर्व गड-किल्ल्यांवर प्लास्टिक आणि मद्यबंदी करावी, असे ठराव या वेळी करण्यात आले. दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके म्हणाले, दुर्गयोद्धे पदरचे पैसे व्यय करून गड-किल्ल्यांचे संवर्धन करत आहेत. गड संवर्धनाची चळवळ बळकट करण्यासाठी मध्यवर्ती समिती स्थापन करावी.

या वेळी उपस्थित दुर्ग संस्थांनी केलेल्या सूचना

१. प्रत्येक तालुक्यात वस्तू संग्रहालय व्हावे.
२. प्रत्येक जिल्ह्यात शासकीय दुर्ग समिती असावी.
३. दुर्ग वनविभागाकडून पुरातत्त्व विभागाकडे द्यावेत.
४. प्रत्येक गड पायथ्याला चौक्या उभारण्यात याव्यात आणि वीरांच्या समाध्या संरक्षित करण्यात याव्यात.