आत्मनिवेदन करतांना सौ. प्रज्ञा जोशी यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आर्ततेने प्रार्थना करतांना थंड भावाश्रू येणे आणि भावावस्था अनुभवणे

‘११.८.२०२० या दिवशी, म्हणजे गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशी रात्री ११ वाजता झोपण्यापूर्वी मी श्रीकृष्णाच्या चरणी संपूर्ण शरण जाऊन प्रार्थना आणि आत्मनिवेदन करत होते. त्या वेळी मी अंथरुणावर बसून डोळे मिटले आणि सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीबाहेर बसून प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, मला मार्ग दाखवून मुक्ती द्या. मला काहीच कळत नाही आणि येत नाही, तरी तुम्हीच मला घडवा आणि या भवसागरातून तारून न्या. मी तुमच्या चरणी संपूर्ण शरण आले आहे. तुम्हाला अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न माझ्याकडून होत नाहीत, त्यासाठी मला क्षमा करा आणि माझ्याकडून ते प्रयत्न करवून घ्या’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’ मी ही प्रार्थना ५ मिनिटे करत असतांना माझ्या डोळ्यांतून थंड भावाश्रू येत होते आणि मी अखंड भावावस्था अनुभवत होते.

सौ. प्रज्ञा जोशी

२. भावावस्था अनुभवतांना जाणवलेली सूत्रे

अ. ‘मी अंथरुणावर नसून अन्य ठिकाणी बसले आहे’, असे मला जाणवत होते. ‘माझ्या आत मूलाधारचक्रापासून सहस्रारचक्रापर्यंत काहीतरी पुष्कळ वेगाने गोल गोल एकाच दिशेने फिरत आहे’, असे जाणवत होते, तर कधी ‘मीच गोल फिरत आहे किंवा आत काहीतरी गोल फिरत आहे’, असे मला वाटत होते.

आ. प्रार्थना करतांना ‘मी संपूर्ण शरण आले आहे’, असे म्हणतांना फिरण्याची गती वाढायची; पण अन्य वेळी ती न्यून असायची. ही भावावस्था मी सलग ५ मिनिटे अनुभवत होते, तेव्हा ‘ती संपूच नये’, असे मला वाटत होते. त्या वेळी येणार्‍या भावाश्रूंची गती पुष्कळ होती. १ – २ चमचे पाणी सांडल्यावर जसे अंथरुण ओले होते, तसे माझे अंथरुण भिजले होते. ही अनुभूती अनुभवतांना मला कृतज्ञता आणि आनंद जाणवत होता.

३. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेली स्वतःची कविता वाचून श्रीकृष्णाच्या चरणी आपली प्रार्थना पोचल्याची जाणीव होऊन कृतज्ञता व्यक्त होणे 

​दुसर्‍या दिवशी श्रीकृष्णजयंती होती. त्या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये मला दोन वर्षांपूर्वी सुचलेली कविता प्रसिद्ध झाली होती. ती वाचून ‘श्रीकृष्णाच्या चरणी आपली प्रार्थना पोचली आहे आणि तो माझ्या समवेत आहे’, याची जाणीव होऊन मी निश्‍चिंत झाले आणि माझ्याकडून त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त केली.

​‘हे श्रीकृष्णा, तू माझ्यासारख्या क्षुद्र जिवाला ‘तू माझ्या समवेत आहेस’, याची अनुभूती देतोस. माझी झोळी फाटकी आहे, तरी या झोळीत तुझे प्रेम साठवण्यासाठी मला पात्र बनव आणि तूच मला घडव’, अशी तुझ्या चरणी आर्तभावाने आणि कृतज्ञतेने प्रार्थना करते.’

– सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी, सनातन संकुल, देवद, पनवेल. (१८.८.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक