चीनमध्ये उघूर मुसलमान महिलांवर होत आहेत सामूहिक बलात्कार ! 

एरव्ही जगात कुठेही जरी इस्लामच्या विरोधात काही झाले, तर इस्लाम खतरे में हैची आरोळी ठोकणारे चीनमध्ये त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारांवर मात्र मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !

नवी देहली – चीनच्या शिनजियांग प्रांतातील उघूर मुसलमान महिलांवर सामूहिक बलात्कार होत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या मुसलमानांसाठी चीनकडून बनवण्यात आलेल्या शिबिरांमध्ये या महिलांवर अत्याचार होत आहेत, असे येथून पळून आलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीवरून समजले. पळून आलेल्यांपैकी एका महिलेने सांगितले, या शिबिरांमध्ये महिलांवर नियोजनरित्या सामूहिक बलात्कार आणि लैंगिक शोषण केले जात आहे. त्यांचा छळ केला जात आहे. याविषयीचा एक अहवाल समोर आला आहे. यानंतर अमेरिकेतील खासदार, मानवाधिकार संघटना आदींनी चीनचा विरोध करत याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. चीनच्या या शिबिरांमध्ये १० लाख उघूर मुसलमानांना ठेवण्यात आले आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

तुरुसुने जियावुदुन नावाची महिला या शिबिरांतून पळून अमेरिकेत पोचली. तिने दिलेल्या माहितीनुसार महिलांना प्रत्येक रात्री त्यांच्या शिबिरातून उठवून नेले जाते. मास्क लावलेल्या लोकांकडून सामूहिक बलात्कार केला जातो. या महिलेवर ३ वेळा असा बलात्कार करण्यात आला आहे.