पणजी, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – केंद्रातील मोदी शासनाने केलेल्या चांगल्या कामगिरीविषयी अपप्रचार करण्यास टुकडे-टुकडे गँग आणि डावे सक्रीय असल्याचा आरोप केंद्रीय मासेमारमंत्री गिरीराज सिंह यांनी केला. येथील भाजप कार्यालयात एका पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह बोलत होते.
ते पुढे म्हणाले, मागील संयुक्त पुरोगामी आघाडी शासनाच्या तुलनेत विद्यमान राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासनाने अर्थसंकल्पात कृषीसाठीच्या आर्थिक तरतुदीत ४३८ टक्क्यांनी वाढ केली आहे. वर्ष २००९ ते २०१४ या काळात केंद्रीय अर्थसंकल्पात कृषीसाठी ८८ सहस्र ८११ कोटी रुपयांची तरतूद होती, तर वर्ष २०१४-२० या काळात केंद्रीय अर्थसंकल्पात कृषीसाठी ४ लक्ष ८७ सहस्र २३८ कोटी रुपयांची तरतूद आहे. वर्ष २०१३-१४ मध्ये कृषी क्रेडीट ७ लक्ष कोटी रुपये होते, ते वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षात १६ लक्ष ५० सहस्र कोटी रुपये आहे. कृषी क्रेडीटमध्ये १३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्ष २०१३-१४ मध्ये ३३ सहस्र कोटी रुपये खर्चून गहू खरेदी करण्यात आला होता आणि वर्ष २०१९-२० मध्ये ६२ सहस्र कोटी रुपये खर्चून गहू खरेदी करण्यात आला. गहू खरेदी करण्याच्या क्षमतेमध्ये ८७ टक्क्यांनी वाढ झाली, तसेच वर्ष २०१३-१४ मध्ये ६३ सहस्र २९८ कोटी रुपये खर्चून, तर वर्ष २०१९-२० मध्ये १ लक्ष ४१ सहस्र कोटी रुपये खर्चून तांदुळ खरेदी करण्यात आला. केंद्राच्या डायरेक्ट बँक ट्रान्स्फर (डीबीटी) योजनेच्या माध्यमातून १०६ लक्ष शेतकर्यांना प्रत्येकी ६ सहस्र रुपये देण्यात आले. मोदी शासनाने कृषी क्षेत्रात केलेल्या या कामगिरीविषयी टुकडे-टुकडे गँग आणि डावे अपप्रचार करत आहेत.