पाकमधील लोकशाही सुनियोजित पद्धतीने नष्ट केली जात आहे ! – पाकचे सर्वोच्च न्यायालय

न्यायाधीश काझी फीज ईसा

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानला सुनियोजित पद्धतीने नष्ट केले जात आहे. देशातील लोकशाही नष्ट केली जात आहे. प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. पाकमध्ये प्रशासन नावाची कोणतीही गोष्ट शिल्लक राहिलेली नाही, अशी कठोर टीका पाकच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश काझी फीज ईसा यांनी केली. ते पाकमधील  पंजाब राज्याच्या सरकारच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी करत होते. वर्ष २०१९ मध्ये सरकारकडून स्थानिक प्रतिनिधित्व समाप्त करण्यात आले होते आणि त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचे अधिकार काढून घेण्यात आले होते. सरकारने म्हटले, ‘आम्ही नवीन पद्धत बनवत आहोत.’ याविरोधात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती ईसा यांनी म्हटले की, स्थानिक प्रतिनिधींचे अधिकार काढून घेऊन लोकशाहीचा गळा घोटण्यात आला आहे. असे लोकशाही देशात होत नाही, तर केवळ ‘मार्शल लॉ’ असणार्‍या देशातच होते. हे राज्यघटनेचे उल्लंघन आहे. अशा पद्धतीने सरकार स्वतःच्या इच्छेनुसार वागणारे लोकप्रतिनिधी निवडेपर्यंत त्यांना समाप्त करत राहील. निवडणूक आयोगाने म्हटले आहे, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी १३१ कोटी रुपये खर्च झाले आहेत.’ आता हे पैसे कुठून येणार ? पाकमधील प्रसारमाध्यमेही स्वतंत्र नाहीत. खर्‍या पत्रकारांना देशाच्या बाहेर टाकले जात आहे.