पाकिस्तान वर्ष २०२१ पाळणार ‘गाय वर्ष’ !

नुसते ‘गाय वर्ष’ पाळण्याऐवजी गोहत्या होणार नाहीत, यासाठी पाकने प्रयत्न केले म्हणजे मानता येईल !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वर्ष २०२१ हे वर्ष ‘गाय वर्ष’ साजरे करण्याचे ठरवले आहे. गायीकडे लक्ष दिले, तर जगाच्या बाजारात दुधाची आणि दुधाच्या पदार्थांची निर्यातही करता येईल अन् इंधनाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी गायीच्या शेणावरील संशोधनाला गती देण्यात येईल, असे सरकारने ठरवले आहे.

१. पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले की, भारत जर शेणापासून ऊर्जा बनवू शकतो, तर आम्हीही मागे रहाणार नाही. चीन आणि हॉलंड यांनी पाकिस्तानला गायीचे दूध ४ पट वाढवण्याचे तंत्रज्ञान देण्याचे मान्य केले आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षण आणि  गायीसाठी कर्ज देण्याची योजना सिद्ध ठेवली आहे. यानंतर त्यांनी उर्जेविषयी चीनचे साहाय्य घेण्याचा प्रयत्न केला. चीनमध्ये शेणावर कोणतेही संशोेधन झालेले नसल्याचे लक्षात आले. पाकमध्ये ‘बॉब इंडिकस’ ही जातीची गाय ४ पट अधिक दूध देवू शकते. (बॉब इंडिकस गाय म्हणजे भारतीय वंशाची मानेवर वशिंड असलेली गाय) त्या गायींचा अधिकाधिक वापर करण्यात येत आहे.

२. पाकचे राज्यमंत्री झरताज गुल यांचे म्हणणे आहे की, गेल्या काही वर्षांपासून  कराचीतील स्थानिक बससेवा ही गायीया शेणाच्या आधारे मिळणार्‍या गॅसवरच चालू आहे. त्यात आता वाढ करण्यात येईल. पाकिस्तानात तो देशव्यापी कार्यक्रम व्हावा, एवढे नियोजन आणि तंत्रज्ञान त्या देशाकडे नाही; पण पर्यावरणाची हानी रोखण्यात गायीचे शेण मोठी भूमिका बजावू शकते.

३. भारताच्या दृष्टीने पाकिस्तानमधील गायींचे वैशिष्ट्य असे की, भारतातील महत्त्वाचे गोवंश पाकिस्तानात आहेत. साहिवाल, कांकरेज, गीर, थारपारकर, हरियान्वी आदी गोवंश सिंधू खोर्‍यात आहेतच; पण सर्वांत उंचीचा मानला जाणारा ‘भगनूर’ हा गोवंश बलुचिस्तानमध्ये आहे.

पाकमध्ये गोहत्या न्यून होण्याची शक्यता अल्पच !

भारतात गोविज्ञानाला गती आल्यापासून भारतीय उपखंड आणि चीनमध्येही गायीचे महत्त्व वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे. काही मासांपूर्वी श्रीलंकेने गोहत्याबंदीचा कायदा संमत केला. त्यानंतर आग्नेय आशियातही त्या विषयाला चालना मिळाली. चीनमधील गरीब राज्य असणार्‍या ‘गन्सू’ प्रांतामध्ये शेतकर्‍यांना ५ कोटी गायी वितरीत केल्या आहेत. अभ्यासकांच्या मते पाकमध्ये सध्या गाय या विषयाला महत्त्व आले आहे, म्हणजे तेथे होणारी गोहत्या न्यून झाली आहे, असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल.