नागपूर येथे रस्ते सुरक्षा कार्यक्रम

नागपूर – रस्ते अपघातात अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अव्हर’मध्ये (सुवर्णकाळात) साहाय्य करणे अत्यावश्यक आहे. आतापर्यंत साहाय्य करणार्यांना ५ सहस्र रुपये मिळायचे. आता ते वाढवून २५ सहस्र रुपये करण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली. ‘राष्ट्रीय महामार्ग परिवहन’ आणि ‘न्यूज-१८’ लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ते सुरक्षा कार्यक्रमांत अभिनेते अनुपम खेर यांनी नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत घेतली. तेव्हा ते बोलत होते.
गडकरी म्हणाले की,…
१. वाहतुकीचे नियम तोडणार्यांना दंड ठोठावला, कायदे कडक केले, तरीही रस्ते अपघातातील मृत्यू थांबलेले नाहीत. मानसिकता पालटत नाही, तोपर्यंत आपण यावर नियंत्रण मिळवू शकत नाही.
२. शालेय शिक्षण घेण्याच्या वयात मुलांवर चांगल्या गोष्टींचा प्रभाव पडला, तर तो कायमस्वरूपी रहातो. त्यामुळे शालेय जीवनातच वाहतुकीच्या नियमांचे धडे मिळणे आवश्यक आहे. भारतात १० सहस्र विद्यार्थी सदोष वाहतूक (ट्रॅफिक) व्यवस्थेमुळे, तर ३० सहस्र विना शिरस्त्राणामुळे दगावतात.
३. नागपूरचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि रोडमार्क संस्थेने ४८ ब्लॅक स्पॉट दुरुस्त केल्यानंतर अपघातांची संख्या ४८ टक्क्यांनी अल्प झाली. घरी कुणीतरी वाट बघत आहे, याचे भान ठेवा.
४. कोरोना काळात, युद्धामध्ये किंवा एखाद्या दंग्यामध्ये जेवढ्या लोकांचा मृत्यू झाला नसेल, तेवढे मृत्यू प्रतिवर्षी रस्ते अपघातामध्ये होतात, याची खंत वाटते. देशात आणखी उत्तम रस्ते सिद्ध होतील; पण लोकांना शिस्त नसल्यास उपयोग नाही.
सिग्नल तोडणे, वेगमर्यादा ओलांडणे, शिरस्त्राण नसणे अशा कितीतरी चुका लोक करतात. घरी आई, पत्नी, मुले वाट बघत असतील, हे लक्षात ठेवून गाडी चालवावी.