मुंबई – केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला विकासप्रकल्पांसाठी १० सहस्र ९३० कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. राज्यांकडून विविध कररूपाने गोळा होणार्या महसुलातून केंद्र सरकार राज्यांना निधी वाटप करण्यात येतो. त्यानुसार जानेवारी २०२४ मध्ये महाराष्ट्राला वरील रक्कम, तर उत्तरप्रदेशला ३१ सहस्र कोटी रुपये आणि बिहारला १७ सहस्र कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
वस्तू आणि सेवा कर, तसेच विविध कररूपाने गोळा होणार्या महसुलातून राज्यांना १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारसीवरून ४१ टक्के रक्कम दिली जाते; मात्र प्रत्यक्षात ३३ टक्केच रक्कम मिळते, असा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला आहे.
याआधी महाराष्ट्राच्या वाट्याला ऑक्टोबरमध्ये ११ सहस्र २५५ कोटी रुपये आले होते. २०२३-२४ या आर्थिक वर्षात केंद्राकडून राज्याला कर महसुलातून ६९ सहस्र ७७० कोटी रुपये मिळाले होते.
विविध विकासप्रकल्प राबवण्यासाठी केंद्राने यंदा राज्यांना देण्यात येणार्या रकमेत वाढ केल्याची माहिती केंद्र सरकारच्या प्रवक्त्याने दिली. जानेवारीसाठी केंद्र सरकारने राज्यांना १ लाख ७३ सहस्र कोटींची रक्कम हस्तांतरित केली आहे. डिसेंबरमध्ये ८९ सहस्र कोटी रुपये देण्यात आले होते.