मनसेकडून सानपाडा येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी !

नवी मुंबई – मनसे सानपाडा विभागाच्या वतीने मनसे जनसंपर्क कार्यालय येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

मनसे विभाग अध्यक्ष योगेश शेटे म्हणाले की, राजमाता जिजाबाई धर्माभिमानी होत्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये धर्म आणि राष्ट्र यांविषयी अभिमान निर्माण केला होता. यामुळे त्यांना स्वतंत्र आणि शक्तीशाली मराठा साम्राज्याचे त्यांचे स्वप्न साकार करता आले. जिजामातेमध्ये तीव्र तळमळ, श्रद्धा, दृढनिश्चय, संयम, धर्माविषयी आदराची भावना, निःस्वार्थीपणा, योद्धा वृत्ती, उदार मन, निर्भयता, नेतृत्व, धैर्य, युद्धनीती, त्यागाची वृत्ती, तसेच विजयाची इच्छा असे बहुगुण होते. राष्ट्राप्रती समर्पणाचे बीज पेरून जिजाबाईंनी त्यांना आदर्श राजा बनवले. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मनसेच्या वतीने आदर्श शिक्षिका स्नेहा सुभेदार आणि महिला उद्योजिका सुरेखा घोगरे यांचा तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त धनुर्विद्या युवा खेळाडू अजित लामखडे, तरुण युवा उद्योजक ऋषिकेश धर्मे यांना तुळशी रोप देऊन सन्मानित करण्यात आले. ओडिशातील भुवनेश्वर येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेत अजित याने मुंबई संघांचे प्रतिनिधित्व करून रौप्य पदक जिंकले.

या कार्यक्रमाच्या वेळी मनसे विभाग अध्यक्ष योगेश शेटे, विभाग सचिव बिरू शेळके, मनसे महिला सेना शहर सहसचिव सौ. रेखा इचके आदी उपस्थित होते.