हडपसर (पुणे) येथे मद्यधुंद तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण !

पुणे – मद्यधुंद तरुणाने वाहतूक पोलिसांशी वाद घालत मारहाण केल्याची घटना ११ जानेवारीला सायंकाळी हडपसरमधील मगरपट्टा परिसरात घडली. या घटनेची चित्रफीत सामाजिक प्रसारमाध्यमांत प्रसारित झाली. या प्रकरणी रात्री विलंबाने तरुणाला हडपसर पोलिसांनी कह्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसाला मारहाण करणारा हा तरुण प्रचंड नशेत होता. हा नशेखोर तरुण मगरपट्टा भागात एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता, तसेच रस्त्यावरून जात असलेल्या अनेकांना तो दगडही फेकून मारत होता. या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्‍यांनी तरुणाला हटकले. त्यामुळे आरोपीने पोलीस कर्मचार्‍याला मारहाण केली, असे सांगण्यात आले.

संपादकीय भूमिका

वारंवार घडणार्‍या अशा घटनांमुळे नागरिकांना पोलिसांचा धाक राहिला नाही, हे गंभीर आहे. पोलीस आतातरी आपली प्रतिमा योग्य करणार का ?