कुर्ला येथे आग !
मुंबई – कुर्ला पश्चिमेकडील रंगून ढाबा या हॉटेलमध्ये रात्री ९.१५ च्या सुमारास भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा दुरूनही दिसत होत्या. उपाहारगृहाच्या खालच्या मजल्यावर आग लागली. अग्नीशमनदलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला.
मुंबई विमानतळावर सोने-चरस जप्त !
मुंबई – सीमाशुल्क अधिकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत १.२५७ किलो सोने आणि ३० किलो चरस जप्त केले. रस अल – खैमाह येथून सोने आणि बँकॉकहून चरस अन् गांजा यांची तस्करी करण्यात आली होती. या प्रकरणी सीमाशुल्क अधिकार्यांनी ६ प्रवाशांना अटक केली आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे ९१ लाख रुपये, तर चरस आणि गांजा यांची किंमत अनुक्रमे ३० कोटी रुपये आणि ११ कोटी रुपये आहे.
संपादकीय भूमिका : संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
टोरेस प्रकरणात ९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त !
मुंबई – आर्थिक गुन्हे शाखेने टोरेस प्रकरणात आस्थापनाच्या विविध शाखांमधून सुमारे ९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तसेच आस्थापनाकडून बक्षीस स्वरूपात गाडी स्वीकारणार्या १५ गुंतवणूकदारांची ओळख आर्थिक गुन्हे शाखेने पटवली आहे.
नागपूर येथे ५५९ मुली आणि महिला बेपत्ता !
नागपूर – प्रेमसंबंध, अनैतिक संबंध, अभिनेत्री होण्याचे स्वप्न, प्रियकराच्या आमिषावर विश्वास, आई अभ्यासासाठी रागावली, भ्रमणभाष हिसकावला, राग अनावर झाला अशा कारणांवरून येथील अल्पवयीन आणि शाळकरी मुली, तरुणी आणि महिला यांनी घर सोडले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात तब्बल ५५९ मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.
संपादकीय भूमिका : या महिलांचा तातडीने शोध घ्यायला हवा !
बालविवाह प्रकरणी १२ जणांसह मंगल कार्यालयाच्या संचालकवरही गुन्हा नोंद !
पिंपरी (जिल्हा पुणे) – आळंदी येथे २१ नोव्हेंबर या दिवशी बालविवाहाचा प्रकार उघड झाला. मुलीचे वय १७ वर्षे ५ महिने आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या पतीसह १२ जण, तसेच गंधर्व मंगल कार्यालयाचे संचालक आणि व्यवस्थापक यांच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद केली आहे. या प्रकरणी श्री. मिलींद वाघमारे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे.