पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सामाजिक समरसता अभियान यात्रा !
पिंपरी (जिल्हा पुणे) – वैदिक हिंदु धर्मात अस्पृश्यतेला कोणतेही स्थान नाही, हिंदु धर्मात कधीही उच्च-नीच प्रमाण सापडत नाही. हिंदु तत्त्वज्ञान हे जगात श्रेष्ठ आहे; परंतु मोगल आणि नंतर ब्रिटिशांनी देशात जाणीवपूर्वक जातीभेद अन् अस्पृश्यतेची भावना पसरवली. त्यामुळे नंतर हिंदु धर्मात तत्त्वज्ञान आणि व्यवहार यात भूल होत गेली. अस्पृश्यता आणि उच्च-नीचतेचा भाव हा विचारातून आणि व्यवहारातूनही संपला पाहिजे, असे मत विश्व हिंदु परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत सहमंत्री अधिवक्ता सतिश गोरडे यांनी व्यक्त केले. विश्व हिंदु परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ३ दिवसांच्या सामाजिक समरसता अभियान यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे वंशज केतन साळवे यांच्या हस्ते यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. संगमवाडीतील आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला विश्व हिंदु परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांतचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सामाजिक समरसता प्रमुख निखिल कुलकर्णी, प्रथमेश परासर आदी उपस्थित होते.