|
वर्धा – भारतीय जनता युवा मोर्चाचे वरुण पाठक यांनी शिवीगाळ करत श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी देणगीच्या नावे खंडणी वसुलीचा आरोप येथील ‘प्रिझम अकॅडमी’ या शिकवणीवर्गाचे संचालक पराग राऊत यांनी २ फेब्रुवारी या दिवशी केला आहे. खासगी शिकवणीवर्ग संचालक संघटनेने या प्रकाराचा निषेध म्हणून २ दिवस ‘शिकवणीवर्ग’ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तर पाठक यांनी संचालकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली असून राऊत यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
या संदर्भात पराग राऊत म्हणाले की, वरुण पाठक यांनी मंदिर कार्यासाठी १ लाख २१ सहस्र रुपयांची मागणी केली; मात्र ‘५ सहस्र रुपयांचीच पावती मिळेल’, असेही त्यांनी सांगितले. मी नकार दिल्यावर त्यांनी ‘शिकवणीवर्गात काही झाले, तर मी उत्तरदायी रहाणार नाही’, अशी धमकी दिली. तरीही मी नकारच दिल्याने त्यांनी माझ्या घरापुढे काही मुलांसह येऊन घोषणा दिल्या. मी घरी नसतांना पत्नी आणि मुलगी यांच्याशी अरेरावी केली. असा प्रसंग इतरांवर येऊ नये, यासाठी सहकार्य करावे, अशा आशयाची पोस्ट राऊत यांनी आपल्या सहकार्यांना समाजमाध्यमातून केली.
याविषयी खासगी शिकवणीवर्ग संचालक संघटनेचे विशाल उराडे म्हणाले की, धमकी देण्याची गोष्ट गंभीर आहे. त्याचा निषेध म्हणून शिकवणी वर्ग बंद ठेवले जाणार आहेत. निधी संकलन उपक्रमाचे संयोजक शिवाजी अडसड म्हणाले, ‘‘बांधकाम निधी संकलन उपक्रमाशी पाठक यांचा काहीच संबंध नाही. संकलनाची कार्यपद्धती ठरलेली आहे. तिघांच्या उपस्थितीतच देणगी मागता येते. पावती पुस्तकांची नोंद असते. कुणीही देणगी मागू शकत नाही.’’
निधी संकलन अभियानाला जाणीवपूर्वक गालबोट लावण्याचा प्रकार ! – वरुण पाठक, जिल्हाध्यक्ष, भाजयुमोवरुण पाठक म्हणाले, ‘‘पराग राऊत यांनी शिकवणीवर्ग चौकाला त्यांच्या ‘प्रिझम अकादमी’चे नाव दिल्याने आपण जाब विचारला होता; परंतु ‘मी क्षमा मागणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा’, असे उर्मट उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. आम्ही कुटुंबाशी अजिबात वाद घातला नाही. या घटनेची चित्रफीत उपलब्ध आहे. यामुळे माझाच नाही, तर समस्त रामभक्तांचा अवमान झाला आहे. निधी संकलन अभियानाला जाणीवपूर्वक गालबोट लावण्याचा हा प्रकार आहे.’’ |