(म्हणे) ‘राष्ट्रध्वजाचा अपमान करणार्‍याला अटक करा !’ – राकेश टिकैत, शेतकर्‍यांचे नेते

शेतकर्‍यांच्या आंदोलनामध्ये समाजविघातक घटक घुसल्याचे पुढे आल्यावर टिकैत यांच्यासारख्या नेत्यांनी त्यांना रोखण्यासाठी काहीही केले नाही, हेच खरे ! त्यामुळे राष्ट्रध्वजाचा हिंसक आंदोलनकर्त्यांकडून झालेल्या अवमानाला टिकैतही तितकेच उत्तरदायी आहे, हे लक्षात घेऊन त्यांच्यावरही कठोर कारवाई होणे आवश्यक !

राकेश टिकैत, शेतकर्‍यांचे नेते

नवी देहली – देशाचा राष्ट्रध्वज हा केवळ पंतप्रधानांचा आहे का ? संपूर्ण देशाचे राष्ट्रध्वजावर प्रेम आहे. ज्याने देशाच्या ध्वजाचा अपमान केला आहे, त्याला अटक करा, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानानंतर व्यक्त केली.

‘नव्या कृषी कायद्यांच्या संदर्भात सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये पुन्हा चर्चेला आरंभ होणार का ?’ या प्रश्‍नावर राकेश टिकैत म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांचा आम्ही सन्मान करतो. शेतकर्‍यांच्या सूत्रांवर आम्ही त्यांच्याकडून तोडगा काढण्याची अपेक्षा करतो; पण आमच्यावर दबावाचे राजकारण करून आम्ही चर्चेला सिद्ध होणार नाही. कोणत्याही अटीशर्तीविना सरकारने चर्चेची सिद्धता ठेवावी.