सनातन परिवाराच्या वतीने श्री. तुषार काकड यांचे अभिनंदन !
अकोला – राज्यस्तरीय ‘गणलक्ष्मी करंडक एकपात्री साभिनय स्पर्धे’त सनातनचे साधक श्री. तुषार काकड (वय २१ वर्षे) या वर्षी ‘गणलक्ष्मी करंडक’चे मानकरी ठरले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मलकापूर-अकोला शाखा आणि श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गणपतराव जाधव आणि लक्ष्मीबाई जाधव स्मृतीप्रीत्यर्थ होणारी ही स्पर्धा १७ जानेवारी या दिवशी पार पडली.
श्री. तुषार यांना ‘गणलक्ष्मी करंडक’ आणि रंगकर्मी विशाल डिक्कर स्मृतीप्रीत्यर्थ ५ सहस्र ५५५ रुपये रोख, तर साहेबराव देशमुख स्मृतीप्रीत्यर्थ ३ सहस्र ३३३ रुपये आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे होते, तर चित्रपट कलावंत आणि माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी श्री. तुषार यांनी एक एकांकिका स्वतःच लिहिली. प्रारंभी त्यांना विषय सुचत नव्हता. त्यानंतर त्यांचे श्रद्धास्थान आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना त्यांनी प्रार्थना केली. त्या वेळी राष्ट्र आणि धर्म या विषयावर लिहिण्याचे सुचले. त्यांनी सध्याच्या बलात्कार, भ्रष्टाचार आदी राष्ट्राला भेडसावणार्या समस्या आणि त्यांवरील ‘आदर्श राष्ट्राची निर्मिती’ ही उपाययोजना यावर आधारित विषय घेऊन ही एकांकिका लिहिली आणि त्यात अभिनयही केला. ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेनेच मला हा विषय सुचला आणि त्यामुळेच पारितोषिकही मिळाले’’, असे श्री. तुषार यांनी सांगितले.