अजिंक्य रहाणे यांची अभिनंदनीय कृती ! सध्या सर्वत्र विविध माध्यमांतून धार्मिक भावना दुखावण्यात येत असतांना किती क्रिकेटपटू, अभिनेते, राजकारणी आदी अन्यांच्या भावनांचा सन्मान करतात ?
मुंबई – कांगारू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. मी तो केक कापला नाही; कारण मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला हरवले, अगदी इतिहास रचला, तरी विरोधी संघाचा सन्मान करायला हवे, असे मला वाटते. त्यामुळेच मी तेव्हा केक कापण्यास नकार दिला होता, अशी माहिती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी मुलाखतीमध्ये दिली. अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया येथील दौर्यात ऑस्ट्रेलियाचा कसोटी सामन्यांत पराभव केला होता. दौर्यावरून घरी परतल्यावर आनंद साजरा करण्यासाठी सोसायटीच्या लोकांनी कांगारू असलेला केक बनवला होता. तो केक कापण्यास अजिंक्य यांनी नकार दिला होता. याविषयी प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्ष भोगले यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये अजिंक्य यांनी याविषयीचे कारण सांगितले.