‘१४.१.२०२१ या दिवसापासून पौष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, उत्तरायण, हेमंतऋतू, पौष मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे.
२. शास्त्रार्थ
२ अ. संकष्ट चतुर्थी : प्रत्येक मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला ‘संकष्ट चतुर्थी’ असे म्हणतात. ज्या दिवशी चंद्रोदय समयी चतुर्थी तिथी असते, त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा उपवास करतात; कारण श्री गणपतीच्या या व्रतामध्ये चंद्रदर्शन होणे विशेष महत्त्वाचे आहे. ३१.१.२०२१ या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री ९.०४ आहे.
२ आ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. ३१.१.२०२१ या दिवशी उत्तररात्री १.१८ पासून १.२.२०२१ या दिवशी सायंकाळी ६.२५ पर्यंत आणि ६.२.२०२१ या दिवशी सायंकाळी ५.१८ पासून ७.२.२०२१ या दिवशी पहाटे ६.२७ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ इ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. ३१.१.२०२१ या दिवशी सकाळी ९.२१ पासून रात्री ८.२५ पर्यंत आणि ३.२.२०२१ या दिवशी दुपारी २.१३ पासून उत्तररात्री १.१० पर्यंत अन् ६.२.२०२१ या दिवशी रात्री ७.१९ पासून ७.२.२०२१ या दिवशी पहाटे ६.२७ पर्यंत विष्टी करण आहे.
२ ई. दग्ध योग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्ध योग होतो. दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. २.२.२०२१ या दिवशी मंगळवार असून दुपारी ४.२० पर्यंत पंचमी तिथी आहे. ५.२.२०२१ या दिवशी शुक्रवार असून सकाळी १०.०८ पर्यंत अष्टमी तिथी आहे. ६.२.२०२१ या दिवशी शनिवार असून सकाळी ८.१४ पर्यंत नवमी तिथी असल्याने ‘दग्ध योग’ आहे.
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२३.१.२०२१)
टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयानंतर वार पालटतो. टीप २ – प्रदोष, घबाड मुहूर्त, भद्रा (विष्टी करण), यमघंट योग आणि संकष्ट चतुर्थी यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे. टीप ३ – शेजारील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत.१. हरिचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥ – संत एकनाथ अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो.२. तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ दाही दिशा ॥ – संत तुकाराम अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’ ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’ |