आपल्या व्यक्तीमत्त्वातील दोष, हेच आपल्या तणावाचे कारण; स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेद्वारे तणाव निर्मूलन शक्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ऑनलाईन आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये ‘तणावनिर्मूलन’ या विषयावर शोधनिबंध सादर

अध्यात्माविषयी नाविन्यपूर्ण संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

मुंबई – आपल्या अस्तित्वाच्या उदात्त उद्देशपूर्तीचा शोध विकत घेतला जाऊ शकत नाही, तर तो एखाद्या आध्यात्मिक उन्नतांच्या मार्गदर्शनानुसार नियमितपणे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवणे, सात्त्विक जीवनशैली अंगिकारणे आणि स्वतः साधना करणे या त्रिसूत्रींद्वारेच मिळू शकतो. आपल्या व्यक्तीमत्त्वातील दोष, हेच आपल्या तणावाचे कारण असून स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेद्वारे त्याचे निर्मूलन शक्य आहे त्यासाठी स्वत:च्या उन्नतीच्या दृष्टीने आजीवन समर्पितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. जर एखाद्याने वैश्‍विक तत्त्वांनुसार प्रामाणिकपणे साधना केली, तर योग्य वेळी आपण आपल्या मनाच्या पलीकडे जाऊ शकतो किंवा आपल्यातील प्रत्येकामध्ये असणार्‍या ईश्‍वरी तत्त्वाचा अनुभव घेऊ शकतो. यालाच परमानंद किंवा आनंदाचा सर्वोच्च बिंदू म्हणतात, जो कशावरही अवलंबून नसतो, असे प्रतिपादन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ‘सुकुल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी रिसर्च’च्या वतीने १८ ते २० जानेवारी या कालावधीमध्ये ‘होमिओपॅथी आणि पारंपारिक औषधे : औषधी वनस्पती अन् मानवी आरोग्य आणि शेती यांच्यासाठी औषधांचा पातळपणा’ या विषयावर ऑनलाईन तिसर्‍या जागतिक काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेची भूमिका, तणाव निर्मूलनासाठी साधना आणि जीवनशक्तीचे पुनरुज्जीवन’ या विषयावरील शोधनिबंधाचा सारांश मांडतांना ते बोलत होते. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अधिपत्याखालील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी’ या संस्थेचे संचालक डॉ. सुभाष सिंह या तिसर्‍या जागतिक काँग्रेसच्या ‘पॅट्रनपदी’ होते.

सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे हे संशोधन सादर केले. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे जगविख्यात वैद्यकीय संमोहनतज्ञ होते. त्यांना २३ वर्षे एक ‘डॉक्टर’ म्हणून वैद्यकीय व्यवसायाचा, भारत आणि इंग्लंड येथे मानसशास्त्राच्या संशोधनाचा आणि ३९ वर्षे आध्यात्मिक संशोधनाचा अनुभव आहे. सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी आरंभी ‘तणाव का येतो ?’, याविषयी ऊहापोह केला. त्यानंतर त्यांनी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आणि व्यक्तीमत्त्वातील दोष दूर करून त्यांचे गुणांमध्ये रूपांतर करण्यासाठी ही प्रक्रिया कशी राबवायची, याविषयी तपशीलवार सांगितले. आध्यात्मिकता आणि सात्त्विक जीवनशैली यांमुळे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेला कशी गती मिळते, हेही त्यांनी सांगितले. नामजप, तसेच शाकाहारी आणि मांसाहारी आहार यांचा लोकांवर होणारा परिणाम यांविषयी ‘गॅस डिस्चार्ज व्हिज्युअलायझेशन (GDV)’ आणि ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या आधुनिक ‘बायोफिडबॅक’ यंत्राद्वारे केलेले संशोधनही त्यांनी या परिषदेमध्ये मांडले.