रेल्वे पुलाच्या ठिकाणी अवैधपणे माती उत्खनन करणार्‍या कंत्राटदारावर कारवाई करा ! – विशाल पवार

विशाल पवार यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

अशी मागणी का करावी लागते ? जी गोष्ट एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यास दिसते, तीच गोष्ट सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या प्रशासकीय यंत्रणेस का दिसत नाही ? जनतेच्या पैशांतून गलेलठ्ठ वेतन घेणारे शासकीय अधिकारी मग नेमके काय करतात ?, असा प्रश्‍न सामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित झाल्यास नवल ते काय ?

निवेदनाच्या वेळी विशाल पवार यांनी सादर केलेले छायाचित्र

सांगली, २८ जानेवारी (वार्ता.) – सांगली-कोल्हापूर या मार्गावरील रेल्वे पुलाचे काम चालू आहे. त्यासाठी नदीपात्रात खांब उभारण्यात येत आहे. हे बांधकाम चालू असतांना नदीपात्रातून कोणाचीही अनुमती न घेता मोठ्या प्रमाणात माती काढण्यात येत आहे, तसेच रॉयल्टी महसूलही भरण्यात आलेला नाही. तरी अशाप्रकारे रेल्वे पुलाच्या ठिकाणी अवैधपणे माती उत्खनन करणार्‍या कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप सांगली महानगर जिल्हा उपाध्यक्ष विशाल पवार यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येथे प्रतिदिन माती काढण्याचे काम चालू असून संबधित तलाठी, तसेच तहसीलदार यांनी कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे शासनाचा महसूल बुडवणार्‍या आणि संबंधित कंत्राटदारास पाठीशी घालणारे अधिकारी यांच्यावरही कारवाई करावी.