जिल्हा गोरक्षा प्रमुख तुकाराम मांडवकर आदर्श गोरक्षक म्हणून विशेष पुरस्काराने सन्मानित

गोरक्षा प्रमुख श्री. तुकाराम मांडवकर (फेटा घातलेले) मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतांना

पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर), २८ जानेवारी – पन्हाळा प्रेस रिपोर्ट्स यांच्या वतीने पत्रकारदिनाच्या निमित्ताने नुकताच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यात कळे येथील जिल्हा गोरक्षा प्रमुख श्री. तुकाराम मांडवकर यांना आदर्श गोरक्षक म्हणून विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री. तुकाराम मांडवकर यांनी आतापर्यंत शेकडो गायींचे पधूवधगृहात जाण्यापासून रक्षण केले असून त्यांचे संवर्धन केले आहे. श्री. मांडवकर यांनी मुलाच्या विवाह पत्रिकेच्या माध्यमातून गायीचे महत्त्व सहस्रो लोकांपर्यंत पोचवले, तसेच या विवाहात गायींचे दान केले.

सत्काराला उत्तर देतांना श्री. मांडवकर म्हणाले, वर्ष १८५७ मध्ये झालेले देशाचे पहिले स्वातंत्र्य युद्ध हे गायीमुळेच घडले. याचे स्मरण म्हणून स्वातंत्र्यदिन हा गोपूजनाने साजरा केला पाहिजे. या प्रसंगी शिवसेनेचे खासदार श्री. धैर्यशील माने, गोकुळचे अध्यक्ष श्री. अरुण नरके, तसेच पन्हाळा प्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.