भावसत्संगात बसल्यावर आध्यात्मिक उपाय होऊन तीव्र शारीरिक त्रासावर मात करता येणे

१. सलग ३ दिवस होणार्‍या त्रासांमुळे नकारात्मक विचार आणि डोकेदुखी यांत वाढ होणे

गेले तीन दिवस माझ्यासाठी संघर्षमय होते. या काळात मला तीव्र त्रासांना सामोरे जावे लागले. एकीकडे उपाय करण्याचे आटोकाट प्रयत्न चालू असतांनाच दुसरीकडे मनातील नकारात्मक विचारांचे प्रमाणही पुष्कळ वाढले होते. १०.४.२०१९ या दिवशी त्रास असह्य झाल्याने मला रडू अनावर झाले. त्याच स्थितीत मी श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुदेव यांना मला मनातील विचारांशी लढण्यास साहाय्य करा, अशी कळवळून प्रार्थना करू लागले. काही वेळाने मला जरा बरे वाटू लागले; परंतु पुष्कळ थकवा जाणवत होता आणि अनावर झोपही येत होती. ११.४.२०१९ या दिवशी सकाळी पुन्हा माझे डोके दुखू लागले. सूर्यास्तानंतर डोकेदुखीचे प्रमाण एवढे वाढले की, डोक्यात जणूकाही घण बसत होते. अशा स्थितीत झोपणे किंवा अन्य कोणतेही काम करणे अशक्य होते. मी याआधी अशी डोकेदुखी कधीच अनुभवली नव्हती.

सौ. नैना काचरू

२. भावसत्संगाला उपस्थित राहिल्यावर नकळत न्यास होऊन परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणे, त्यानंतर डोक्यातून काहीतरी जोरदारपणे खेचले जात असल्याचे जाणवणे, दुसर्‍या दिवशी डोकेदुखी उणावणे अन् मन सकारात्मक होणे

रात्री १० च्या सुमारास मला स्थानिक साधकांकडून निरोप आला, तुम्ही स्थानिक हिंदी भावसत्संगाला बसू शकता. स्थानिक सत्संगाला बसण्याची ही माझी पहिलीच वेळ असल्याने नेमके काय करायचे ?, ते मला कळत नव्हते. त्यातच डोकेदुखीही प्रचंड वाढली होती. त्या स्थितीतही मी सत्संगाला गेले आणि काही मिनिटांतच नकळत अनाहतचक्र अन् आज्ञाचक्र यांवर न्यास करू लागले. त्या वेळी मला परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवू लागले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची आठवण येऊ लागली. मनात बरेच प्रश्‍न उमटत होते; परंतु मी त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. सत्संगात आपले अनुभवकथन करणार्‍या साधकांमधे भाव जाणवत होता. त्यांचे बोलणे ऐकतांना साधनेच्या प्रयत्नांत मी अल्प पडते, याची जाणीव होऊन मी प्रयत्न वाढवले पाहिजेत, असे तीव्रतेने वाटू लागले. अवघ्या काही मिनिटांतच डोक्यातून काहीतरी जोरदारपणे खेचले जात आहे, असे जाणवू लागले आणि त्यानंतर मला ग्लानी येऊन मी झोपले. दुसर्‍या दिवशी जाग आल्यावर मला पुष्कळ बरे वाटत होते. डोकेदुखी पूर्णपणे नाहीशी झाली होती आणि पुष्कळ सकारात्मकही वाटत होते. अनुमाने एका आठवड्याच्या नैराश्यानंतर मी पहिल्यांदा सकारात्मकता अनुभवत होते. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने भावसत्संग मिळाला; म्हणून पुनःपुन्हा कृतज्ञता व्यक्त होत होती. माझे साधनेतील प्रयत्न अल्प पडत असूनही मला सत्संगरूपी प्रसाद मिळाला. यावरून परात्पर गुरुदेवांच्या निरपेक्ष प्रीतीची प्रचीती आली.

– श्री गुरुचरणी अखंड कृतज्ञताभावात राहणारी, सौ. नैना काचरू (पूर्वाश्रमीच्या कु. नैना अरविंद), भारत (१३.४.२०१९)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक