केरळच्या बिशपकडून सत्ताधारी माकपकडे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत एका ख्रिस्ती उद्योगपतीला तिकीट देण्याची शिफारस !

सामाजिक माध्यमांतून बिशपवर टीका

भारतीय लोकशाही निधर्मी असतांना एका धर्माच्या पदाधिकार्‍याकडून अशा प्रकारची शिफारस एका राजकीय पक्षाकडे कशी काय केली जाऊ शकते ? अशी शिफारस हिंदूंच्या एखाद्या संतांनी एखाद्या पक्षाकडे केली असती, तर तथाकथित निधर्मीवादी, साम्यवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी एकच कल्लोळ केला असता; मात्र येथे ते शांत आहेत, यातून त्यांचा ढोंगीपणा उघड होतो !

कॅथॉलिक उद्योगपती इस्साक वर्गीस आणि बिशप जॅकब मनथोदाथ (सौजन्य : asianews.it)

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमधील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने (सी.पी.आय.एम्.ने) आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये चर्चचे समर्थन असलेल्या उमेदवाराला तिकीट देण्याची शिफारस बिशप जॅकब मनथोदाथ यांनी ११ जानेवारी या दिवशी माकपचे राज्य सचिव कनम राजेंद्रन् यांना गोपनीय पत्र लिहून केली आहे. यात इस्साक वर्गीस नावाच्या एका कॅथॉलिक उद्योगपतीला तिकीट देण्याची शिफारस करण्यात आली आहे. हे पत्र उघडकीस आल्यानंतर बिशप (ख्रिस्त्यांचे वरच्या श्रेणीतील धर्मगुरु. जिल्हा किंवा शहर येथील चर्च त्यांच्या देखरेखीखाली येतात.) यांच्यावर टीका होऊ लागली आहे. सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतरही बिशपकडून पत्र लिहिण्याविषयी कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. केरळमध्ये १८ टक्के ख्रिस्ती असल्याने त्यांची मतपेढी आहे. राज्यात सरकार स्थापनेसाठी त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. (केरळमधील १८ टक्के ख्रिस्ती आणि भारतातील १४ टक्के मुसलमान एकगठ्ठा मतांद्वारे शासनकर्ते निवडण्याचा प्रयत्न करतात; मात्र ७४ टक्के हिंदू असतांना त्यांची मतपेढी नाही आणि ते त्यांना हव्या त्या राजकारण्यांना सत्तेवर बसवू शकत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक)

केरळच्या कॅथॉलिक बिशप्स कौन्सिलचे (केसीबीसीचे) उप सचिव फादर जॅकब पालकप्पिली यांनी यावर म्हटले की, चर्चने सर्व राजकीय पक्षांपासून दूरच रहाणे योग्य आहे. चर्च अनेक वर्षांपासून यावर कायम आहे. बिशप जॅकब यांनी केलेली शिफारस हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. (राजकारण्यांप्रमाणे बोलणारे ख्रिस्ती पाद्री ! – संपादक)