ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी श्री हनुमानाचे चित्र पोस्ट करून मानले भारताचे आभार !

 भारताने ब्राझिलला पाठवले कोरोना लसीचे २० लाख डोस !

विदेशातील ख्रिस्ती राष्ट्रपतींनाही श्री हनुमानाचे महत्त्व ठाऊक आहे आणि त्याविषयी आदरही वाटतो, तसेच ते भारताकडे हिंदु राष्ट्र म्हणून पहातात, हेच यातून दिसून येते. ही भारतातील बुद्धीप्रामाण्यावाद्यांना चपराकच होय !

ब्राझिलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – भारताने ब्राझिलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना लसीचे २० लाख डोस पाठवण्याची विनंती केल्यावर भारताने माणुसकीच्या नात्याने ब्राझिलला २० लाख डोस पाठवले. यामुळे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. यासाठी त्यांनी ट्विटरवर एक चित्र पोस्ट केले आहे. त्यात श्री हनुमान भारतातून संजीवनी असलेला डोंगर हातात घेऊन ब्राझिलमध्ये येत आहे, असे दाखवण्यात आले आहे. रामायणामध्ये श्री हनुमान संजीवनी बुटी आणून श्रीराम आणि श्रीलक्ष्मण यांचे प्राण वाचवतो. त्यामुळे भारताने ‘कोरोनाविरोधी लस पुरवून एकप्रकारे ब्राझिलला ‘संजीवनी’ पुरवल्याचे बोलसोनारो यांना म्हणायचे आहे. यात ट्विट करतांना बोलसोनारो यांनी इंग्रजीत ‘इंडिया’ किंवा ‘थँक यू’ असे न म्हणता ‘धन्यवाद भारत’ असे म्हटले आहे.

१. जेअर बोलसोनारो यांनी यात म्हटले आहे, ‘जागतिक संकटाला दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेला एक सहकारी ब्राझिलला भेटला, याचा अभिमान वाटत आहे. ब्राझिलला लसीचा पुरवठा करून सहकार्य केल्यामुळे भारताचे आभार.’

२. बोलसोनरो यांच्या ट्वीटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिसाद देत म्हटले की, बोलसोनारोजी, कोविड महामारीविरुद्ध एकजुटीने लढण्यासाठी ब्राझिलचा विश्‍वासू सहकारी होणे, हा आमचा सन्मान आहे. दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करून संबंध बळकट करतील.