धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे

धनंजय मुंडे

मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेने केलेली बलात्काराची तक्रार तिने मागे घेतली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने हे वृत्त दिले आहे.

तपास अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात या महिलेने म्हटले आहे की, धनंजय मुंडे आणि माझ्या बहिणीमधील संबंध बिघडले होते. त्यामुळे मी मानसिक तणावात होते. मुंडे यांच्याविरोधात मी केलेल्या तक्रारीचा राजकीय हिशेब चुकता करण्यासाठी वापर केला जात असल्याचे माझ्या लक्षात आले आहे. त्यामुळे मी मुंडे यांच्या विरोधातील तक्रार मागे घेत आहे. माझी बलात्काराच्या संदर्भात तक्रार नाही.

चित्रपटात काम मिळवून देतो असे सांगून धनंजय मुंडे यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. बलात्काराच्या आरोपांमुळे मुंडे अडचणीत आले होते. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. पोलिसांकडून या प्रकरणी सखोल चौकशी चालू केली असतांनाच आता मध्येच या महिलेने माघार घेतली आहे.

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टि्वटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, खोटे आरोप करणे, खोटे गुन्हे नोंद करणे चुकीचे आहे. त्यामुळे खर्‍या पीडित महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन पालटतो. हे समाजाच्या हिताचे नसल्याने पोलिसांनी खोटे आरोप करणार्‍या महिलेवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.