पुणे – कोरोना प्रतिबंधक लसीमुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नकाशावर स्थान मिळवलेल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये लागलेली आग आणि आगीत ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. कोविड प्रतिबंधक लसनिर्मिती आणि लस साठ्यांचा आग लागलेल्या इमारतीशी कोणताही संबंध नाही. कोविड लस प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून तज्ञांच्या पथकांकडून पहाणी केल्यानंतरच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला लागलेल्या आगीची पहाणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २१ जानेवारी या दिवशी सायंकाळी दुर्घटनास्थळाला भेट दिली.
कोविडप्रतिबंधक लसनिर्मिती आणि लससाठ्यांचा आग लागलेल्या इमारतीशी कोणताही संबंध नाही. कोविड लस कार्यक्रम पूर्णपणे सुरक्षित आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 21, 2021
सदर इन्स्टिट्युट ‘एस्.ई.झेड.’ क्षेत्रात असून इन्स्टिट्युट इमारतीचे फायर ऑडिट, एनर्जी ऑडिट तसेच इतर आवश्यक तपासण्यांची पूर्तता करण्यात आली होती का, याचीही चौकशी करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाचे अधिकारी आणि जवान यांनी उत्तम कामगिरी केल्याचे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.