गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा !

परात्पर गुरु डॉ. आठवले

सौ. मंगला मराठे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी १९९१ या वर्षी साधनेला आरंभ केला. या साधनाप्रवासात त्यांना वेळोवेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सान्निध्य आणि मार्गदर्शन यांचा लाभ झाला. परात्पर गुरुमाऊलीच्या समष्टी साधनेसाठी उपयुक्त अवतारी व्यक्तीत्वाचे सारे रेशीमधागे उलगडणारा हा साधनाप्रवास सौ. मंगला मराठे यांनी शब्दबद्ध केला आहे. आपण तो त्यांच्या शब्दांतच अनुभवण्याचा प्रयत्न करूया.

१६ जानेवारी या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संत भक्तराज महाराज यांच्याविषयी अनन्य भाव याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.

(भाग ५)

भाग ४. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/441940.html


सौ. मंगला मराठे

९. कांदळी आश्रमातील वास्तव्य आणि शिकायला मिळालेली सूत्रे

९ आ. संतदर्शनासाठी कसे जावे ?

१. संतांच्या दर्शनाला जातांना आणि दर्शन घेऊन येतांना प्रवासात अवांतर बोलणे टाळण्यासाठी आणि अंतर्मुख रहाण्यासाठी चारचाकीत भजने लावण्यास सांगितली.

२. ‘स्वतः नामजप करणे आणि दुसरा कुणी नामजप करत असेल, तर त्याच्या नामजपात व्यत्यय न आणणे, या गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात’, हे सांगितले.

३. संतांच्या आश्रमातील विविध ठिकाणची स्पंदने अनुभवावयास सांगितली.

४. संतांच्या आश्रमात गेल्यावर तेथे जमेल ती सत्सेवा करण्यास सांगितले.

९ इ. आश्रमात ‘देहबुद्धी विसरून कसे रहायचे ?’, हे कृतीतून शिकवणे : त्या रात्री आम्ही सर्वजण परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत कांदळी येथील आश्रमातच राहिलो आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘प्राप्त परिस्थितीत (आहे त्या स्थितीत) देहबुद्धी विसरून कसे रहायचे ?’, हे आम्हाला कृतीतून शिकवले.

१. तेथे स्त्रियांना केवळ कपडे पालटण्यासाठी ४ – ५ कुटी बांधल्या होत्या.

२. रात्री आम्ही सर्व साधक २ गट करून अंगणातच झोपलो होतो. आमच्यासमवेत परात्पर गुरु डॉक्टरही (दगड-माती असलेल्या) त्या अंगणातच भूमीवर झोपले होते. त्यातून परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला ‘साधकांनी देहबुद्धी विसरून कसे जगायचे ?’, हे शिकवले.

९ ई. परात्पर गुरु डॉक्टरांनी अंघोळीसाठी स्वतःसमवेत साधकांना नदीवर घेऊन जाणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी आमच्या समवेत आलेल्या सर्व पुरुष साधकांना जवळच्या नदीवर अंघोळीसाठी नेले आणि स्वतःही तेथेच अंघोळ करून स्वतःचे आवरले.

९ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रत्यक्ष अनुभूतीतून अध्यात्मशास्त्र शिकवणे

९ उ १. कांदळी आश्रमात प.पू. भक्तराज महाराज भजने म्हणत असतांनाही परात्पर गुरु डॉक्टरांनी भजनात अडकू न देता सत्सेवा करण्यास सांगणे : आम्ही कांदळी आश्रमात गेलो. तेव्हा प.पू. भक्तराज महाराज घंटोन्घंटे भजने म्हणत होते; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला थोडा वेळ भजने ऐकल्यावर भजनात अडकू न देता आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करण्यास सांगितली. तेथे त्यांनी आम्हाला ‘वाढणे, स्वच्छता करणे’ इत्यादी सत्सेवा करायला शिकवल्या.

९ उ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कांदळी आश्रमातील विविध स्पंदने ओळखण्यासाठी साधकांचा अभ्यासवर्ग घेऊन ‘तेथील चैतन्य कसे ग्रहण करायचे ?’, हे साधकांना प्रत्यक्ष शिकवले.

९ उ ३. अनुभूतीतून ‘भावजागृती’चे सूत्र शिकवणे

९ उ ३ अ. प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकतांना, त्यांचे दर्शन घेतांना आणि कांदळी आश्रमातून निघतांना साधकांना रडू येणे, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘अध्यात्मशास्त्रानुसार ‘भाव’ म्हणजे काय ?’, हे सांगून त्याचे विश्लेषण करणे : ‘भावजागृती’ म्हणजे काय ?’ हे मला ठाऊक नव्हते. त्या वेळी पुष्कळ साधकांना भजने ऐकतांना, प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबांचे) यांचे दर्शन घेऊन त्यांना नमस्कार करतांना आणि आश्रम सोडून परत येतांना रडू आवरत नव्हते. परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या सान्निध्यात राहिल्यावर भाव कसा जागृत होतो ?’ हे प्रत्यक्ष अनुभूतीतूनच शिकवले. परात्पर गुरु डॉक्टरांनी तेव्हा तेथे लगेचच ‘भाव’ या विषयावर अभ्यासवर्ग घेऊन, शिकवून आणि विश्लेषण करून सर्वांच्या शंकांचे निरसन केले.

अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला अध्यात्मातील विविध पैलू कृतीच्या स्तरावर आणि अनुभूतीतून शिकवले.

१०. स्वतःचे वेगळे अस्तित्व न जपता सहजावस्थेत रहाणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

१० अ. ‘स्वतःमुळे इतरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही’, यासाठी सतत दक्ष असणे : गेल्या २५ वर्षात मी ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी इतर संताप्रमाणे कोणत्याही साधकाकडून स्वतःची कुठली कामे करून घेतली आहेत’, असे पाहिले नाही. सर्वसामान्य व्यक्ती पंख्याच्या कळफलकासमोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पंखा तरी लावण्यास सांगते; परंतु त्यांनी गेल्या २५ वर्षात ‘पंखा लावा’, असेही कधी कुणाला सांगितल्याचे मी ऐकले नाही. ते स्वतःच उठून पंखा लावतात.

१० आ. स्वतः अवतारी संत असूनही सर्व सामान्यांप्रमाणे सहजतेने वागणे

१० आ १. साधकांसमवेत अभ्यासवर्गाच्या नियोजनाच्या आणि अन्य चर्चेत सहभागी होणे : आम्ही १० – १५ साधक अभ्यासवर्गाची सिद्धता करण्यासाठी जमत होतो. अभ्यासवर्ग संपल्यावर त्यात राहिलेल्या त्रुटी, पुढच्या वेळी करायच्या सुधारणा, पुढील अभ्यासवर्गाचे नियोजन आणि अन्य चर्चा करण्यासाठी एकत्र जमत होतो. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरही आमच्या समवेत त्या चर्चेत सहभागी व्हायचे.

१० आ २. साधकांसमवेत ‘आइसफ्रूट’ खाणे : आम्ही कांदळीच्या आश्रमात पहिल्यांदा गेलो होतो; म्हणून परात्पर गुरु डॉक्टर स्वतःच आम्हाला आश्रम परिसर दाखवत होते. त्या वेळी तेथे एक ‘आइसफ्रूट’वाला उभा होता. तेव्हा आम्हा सर्वांनाच ‘आइसफ्रूट’ खावेसे वाटले होते. आमच्या मनातील हा विचार परात्पर गुरु डॉक्टरांनी ओळखला आणि त्यांनी आम्हा सर्वांना ‘आइसफ्रूट’ घेऊन दिले आणि स्वतःही आमच्या समवेत ते खाल्ले. परात्पर गुरु डॉक्टर स्वतःचे वेगळे अस्तित्व किंवा कुठलाही वेगळेपणा जपत नव्हते. ते आमच्यात सहजतेने मिसळून वागत होते.

१० आ ३. साधकांसमवेत पावभाजी खाण्यासाठी जाणे : एकदा ते आमच्या समवेत मीरामार समुद्रकिनार्‍यावर (बीचवर), तर एकदा मार्गावरील टपरीवरील पावभाजी खाण्यासाठी आले होते. परात्पर गुरु डॉक्टर स्वतःसाठी कोणतीही वेगळी वागणूक स्वीकारत नव्हते. स्वतःच्या कृतीतूनच ते आम्हाला ‘सर्वांमध्ये मिसळून कसे रहायचे’, हे शिकवत होते.

१० आ ४. साधकांनी नवीन वाहन घेतल्यावर स्वतः ते चालवून साधकांना आनंद देणे : प्रसारसेवेत असलेल्या साधकांपैकी कुणी नवीन वाहन घेतले, तर ते वाहन परात्पर गुरु डॉक्टर स्वतः चालवायचे. त्यामुळे साधकांना आनंद होत असे, उदा. वर्ष १९९२ मध्ये आम्ही एक चारचाकी गाडी घेण्याचे ठरवले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः ती गाडी चालवून बघितली आणि ‘गाडी चांगली आहे’, असे सांगून ती घेण्यास सांगितले. काही साधकांनी नवीन दुचाकी घेतल्यावरही त्यांनी त्याही चालवल्या होत्या.

(क्रमश: मंगळवारच्या अंकात)

– सौ. मंगला मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.४.२०१७)


भाग ६. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/442861.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक