पणजी, १५ जानेवारी (वार्ता.) – देशाचे उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू यांनी १५ जानेवारी या दिवशी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला (गोमेकॉ) भेट देऊन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या आरोग्याची चौकशी केली. रस्ता अपघातानंतर केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर ‘गोमेकॉ’त उपचार चालू आहेत. या वेळी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू यांना त्यांचे आरोग्य सुधारत असल्याचे सांगितले.
या भेटीनंतर उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू ट्वीट करून म्हणाले, ‘‘डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या आरोग्यात खूप चांगली सुधारणा झालेली आहे.’’ उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू यांच्या ‘गोमेकॉ’ भेटीवेळी समवेत असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पत्रकारांना म्हणाले, ‘‘श्रीपाद नाईक यांच्या आरोग्यात खूप चांगली सुधारणा झाली आहे आणि त्यांना लवकरच अतीदक्षता विभागातून हालवण्यात येणार आहे.’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरभाषद्वारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी केली चर्चा
उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू यांनी श्रीपाद नाईक यांची भेट घेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरभाषद्वारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी चर्चा केल्याची माहिती केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या कार्यालयातून देण्यात आली. या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले आहे.