गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा !

परात्पर गुरु डॉ. आठवले

सौ. मंगला मराठे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी १९९१ या वर्षी साधनेला आरंभ केला. या साधनाप्रवासात त्यांना वेळोवेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सान्निध्य आणि मार्गदर्शन यांचा लाभ झाला. ‘परात्पर गुरुदेवांच्या प्रथम भेटीतच त्यांची लागलेली ओढ, सतत सहजावस्थेत राहून स्वतःचे वेगळेपण जाणवू न देणारे परात्पर गुरुदेवांचे आगळे वेगळे व्यक्तीमत्त्व, त्यांची शिकवण्याची अनोखी पद्धत; साधक, कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक यांचे त्रास दूर करणारे त्यांचे प्रेम, त्यांच्या प्रीतीवर्षावाची अनुभवलेली व्यापकता, साधकांचे त्रास दूर करून अन् वेळप्रसंगी स्वतः सहन करून त्यांचे सर्वार्थाने रक्षण करणार्‍या प्रेमळ गुरुमाऊलीचे वात्सल्य आणि या सगळ्यातून अनुभवलेले अध्यात्मशास्त्रातील एक महान शास्त्रज्ञाचे अष्टपैलूत्व’, असे हे परात्पर गुरुमाऊलीच्या समष्टी साधनेसाठी उपयुक्त अवतारी व्यक्तीत्वाचे सारे रेशीमधागे उलगडणारा हा साधनाप्रवास सौ. मंगला मराठे यांनी शब्दबद्ध केला आहे. आपण तो त्यांच्या शब्दांतच अनुभवण्याचा प्रयत्न करूया.

​१४ जानेवारी या दिवशी परात्पर गुरुदेवांनी पत्रलेखनातून शिकवलेले वेळेचे महत्त्व याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.

(भाग ३)

भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/441172.html


सौ. मंगला मराठे

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांना घडवण्याची आणि शिकवण्याची पद्धत

५ अ. अध्यात्मात प्रायोगिक भागाला अधिक महत्त्व असल्यामुळे साधकांकडून तसे प्रयत्न करवून घेऊन त्यांना साधनेतील पुढच्या टप्प्याला नेणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी नेहमीच कृतीला पुष्कळ महत्त्व दिले. ‘त्यांनी शिकवलेला तात्त्विक भाग साधक आचरणात आणतात कि नाही ?’, याकडे त्यांचे पुष्कळ लक्ष असायचे. ‘साधकांनी केलेले विशेष प्रयत्न, योग्य कृती, त्यांना आलेल्या अनुभूती’ यांकडे त्यांचे अधिक लक्ष असायचे. त्यातूनच ते साधकांना शिकवत होते. त्याचप्रमाणे साधकांनी पुढच्या टप्प्याची साधना करावी, यासाठी परात्पर गुरु डॉक्टर अतिशय प्रयत्न करायचे.

५ आ. साधिकेला बोलण्यास उद्युक्त करून साधनेत तनासमवेत बुद्धीचेही अर्पण महत्त्वाचे असल्याचे शिकवणे :
 मला अभ्यासवर्गात सर्वांसमोर येऊन बोलायला जमत नव्हते. त्यांनी अभ्यासवर्गात ‘प्रश्‍न विचारल्यावर मला उत्तर द्यावे लागू नये’, यासाठी मी अभ्यासवर्गात शेवटच्या आसंदीवर बसत होते; परंतु तरीही ते मला प्रश्‍न विचारायचे किंवा मी पाठवलेल्या पत्रातील सूत्रे मला वाचून दाखवायला सांगायचे. त्यातून त्यांनी ‘अध्यात्मात केवळ शरिराने, म्हणजे तनाने सेवा करणे याच्यासमवेतच बुद्धीही अर्पण करणेही महत्त्वाचे आहे’, हे मला कृती करायला लावून शिकवले.

५ इ. परात्पर गुरु डॉक्टरांनी अभ्यासवर्गात साधिकेचा हळूहळू बोलण्याचा सराव करून घेणे, नंतर तिला ‘अध्यात्म’ या विषयावर प्रवचन करण्यास सांगून तिची व्यासपिठावर जाऊन बोलण्याची भीती घालवत पुढच्या टप्प्याची साधना करवून घेणे : गोव्यात अध्यात्मप्रसार करतांना अनेक ठिकाणी प्रवचने दिली जात असत. त्या वेेळी मी ‘प्रवचनाची सिद्धता करणे आणि नंतरची आवरा-आवर करणे’, अशा सेवा करायचे; कारण मला लोकांसमोर बोलायला भीती वाटायची. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘‘त्या (मी) प्रवचनात बोलणार असतील, तरच त्यांना प्रवचनाला आणा’’, असे यजमानांंना सांगितले. माझी भीती जाण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला प्रथम अभ्यासवर्गात अनुभूती सांगायला लावली. त्यानंतर हळूहळू प्रवचनातील काही सूत्रे सांगायला लावून प्रवचनात बोलायला शिकवले. त्यानंतर पूर्ण प्रवचन, सत्संग, सभा, सूत्रसंचालन इत्यादी कृती करायला लावून माझी व्यासपिठावर जाऊन बोलण्याची भीती न्यून केली. व्यासपिठावर जातांना थरथर कापणारी मी केवळ त्यांच्या कृपेनेच या टप्प्यापर्यंत येऊ शकले.

५ ई. साधकांच्या लहान लहान चुका दाखवून त्यातून शिकवणे : परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक मासात एकदा होणार्‍या अभ्यासवर्गात साधकांकडून झालेल्या लहान लहान चुकाही सांगत होते. त्यातून ‘साधकांनी शिकावे’ हा त्यांचा उद्देश असायचा, उदा. एका साधकाने दुधावरील ताटली काढून ओट्यावर ती उलटी न ठेवता तशीच ठेवली. त्यामुळे त्या ‘ताटलीला ओट्यावरील धुळीचे कण किंवा अन्य काही चिकटून ते दुधात पडू शकते’, हे त्यांनी आमच्या लक्षात आणून दिले.

५ उ. सेवांमधील बारकाव्यांचा अभ्यास करून स्वतःच्या कृतीतून भावपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सेवा करण्यास शिकवणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी अर्पण गोळा करण्यापासून ते स्मरणिका काढणे, गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे, भंडारा ठरवणे, ग्रंथप्रदर्शन लावणे इत्यादी सेवांच्या विविध पैलूंचे बारकावे आम्हाला सांगितले आणि स्वतःच्या प्रत्यक्ष कृतीतून ‘भावपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सेवा कशी करायची ?’ ते  शिकवले.

६. साधकांविषयीचा प्रेमभाव

६ अ. प्रत्येक वेळी गोव्याला येतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांसाठी आठवणीने भेटवस्तू आणणे : परात्पर गुरु डॉक्टर ज्या वेळी गोव्याला यायचे, त्या प्रत्येक वेळी ते सर्व क्रियाशील साधकांसाठी काही ना काही भेटवस्तू आणत होते. त्याचप्रमाणे मुंबईहून गोव्याला कुणी साधक येणार असतील, तर ते त्यांच्यासमवेतही आमच्यासाठी आठवणीने खाऊ पाठवायचे. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टर जणू आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य झाले होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला एवढे प्रेम दिले की, ‘आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांच्या सनातन कुटुंबातील कायमचे सदस्य कधी झालो ?’, हे आम्हाला कळलेही नाही.

६ आ. अध्यात्मप्रसार करणार्‍या साधकासमवेतच संपूर्ण कुटुंबाचे दायित्व स्वीकारून त्यांच्या अडचणी सोडवणे : आम्ही काही साधक आमची मुले-बाळे, चाकरी आणि संसार सांभाळून अध्यात्मप्रसार करत होतो. आम्हा सर्वांचेच दायित्व परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वीकारले होते. आम्हा साधकांपैकी कुणाच्याही घरी काही अडचण असल्यास परात्पर गुरु डॉक्टर स्वतःच ती अडचण सोडवत होते. आम्हा पती-पत्नीत काही मतभेद झाले, तर परात्पर गुरु डॉक्टरांना काही न सांगताच, ते कळत होते. तेव्हा ते आम्हा दोघांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या समस्यांचे निवारण करत होते. त्यांचा केवळ ‘आमची साधना व्यवस्थित व्हावी’, हा एकच उद्देश असायचा.

६ इ. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांची अडचण ‘शारीरिक, मानसिक कि आध्यात्मिक आहे ?’, याचे निदान करून त्यानुसार उपाय सांगणे : परात्पर गुरु डॉक्टर साधकांना येणार्‍या कौटुंबिक अडचणी आणि साधनेतील अडथळे यांवर वरवरचे उपाय न सांगता त्या समस्यांच्या मुळाशी जात होते. त्याचप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टर हे अडथळे ‘शारीरिक, मानसिक कि आध्यात्मिक आहेत ?’, याचे निदान करून साधकांना त्यावर उपाय सांगत होते. परात्पर गुरु डॉक्टर एखाद्या दुखण्यावर ‘अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदिय आणि होमिओपॅथी या औषधोपचार पद्धतींपैकी कोणती उपाययोजना चांगली लागू पडेल ?’ हेही आम्हाला सांगायचे. या सगळ्यामुळे आमची परात्पर गुरु डॉक्टरांवरील श्रद्धा दिवसेंदिवस वाढत गेली.

(क्रमश: उद्याच्या अंकात)

– सौ. मंगला मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.४.२०१७)

भाग ४. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/441940.html

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक