साधकांनो, हिंदु राष्ट्राची भावी पिढी घडवण्यासाठी आपल्या पाल्याच्या साधकत्वाकडे कटाक्षाने लक्ष देऊन त्यांना साधनेत साहाय्य करा !

‘युवा संघटनाच्या दौर्‍यानिमित्त महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथे जाण्याची संधी देवाच्या कृपेने मिळाली. त्या वेळी साधकांची मुले, बालसाधक आणि युवा साधक यांचे निरीक्षण झाले. ‘सर्व पाल्यांच्या भवितव्यासाठी आणि साधनेसाठी त्यांच्यावर साधकत्वाचे संस्कार होणे’, ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी हा लेख श्री गुरुचरणी अर्पण करत आहे. ‘यातून सतर्क व्हावे आणि पाल्यांनी, तसेच युवकांनी ‘गुरूंच्या शिकवणीप्रमाणे वागत आहोत ना ?’, याचे चिंतन करावे’, असे सर्व पाल्य अन् साधक पालक यांना नम्र आवाहन ! हा लेख आपल्या पाल्याला आणि युवा मुलाला अथवा मुलीला समवेत घेऊन वाचावा.

१. ‘ऑनलाईन शाळा-महाविद्यालयाच्या निमित्ताने पाल्य भ्रमणभाषवर अनावश्यक गोष्टी पहातात का ?’, याविषयी पालकांनी सतर्क रहाणे आवश्यक !

कोरोना महामारीमुळे शाळा आणि महाविद्यालये यांचे शिक्षण ‘ऑनलाईन’ चालू झाले. यासाठी सामाजिक माध्यमांचा उपयोग केला जातो. या वेळी ‘ही मुले पालकांचे ‘व्हॉट्सअ‍ॅप’ खाते हाताळतात, त्यांचे संदेश वाचतात आणि पालकांना न विचारता मोठ्यांना उत्तर देतात’, असे आढळून आले. लहान मुलांनी पहायला नकोत, अशी ऑनलाईन विज्ञापने भ्रमणभाषवर येतात. ती चुकून मुलांनी पाहिली, तर त्यामुळे मुलांवर कुसंस्कार होऊ शकतो. अशी विज्ञापने शाळेच्या वेळेत आली, तर पालकांना ते कळणारही नाही. चुकून ‘यू ट्यूब’, ‘गूगल’ पहातांना पाल्यांनी असे व्हिडिओज् किंवा छायाचित्रे पाहिली, तर त्यांच्या मनावर झालेला कुसंस्कार घालवायला पुढे पुष्कळ श्रम घ्यावे लागतात. शाळा आणि महाविद्यालय यांच्या वेळेत मुले अन्य मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात येतात, तसेच त्यांच्याशी सामाजिक माध्यमांवरून संपर्क ठेवतात. त्या वेळी चुकून जे नको ते शिकल्यास त्यांच्यावर त्याचा लगेच परिणाम होतो. ही गोष्ट पालकांना शेवटपर्यंत लक्षात येत नाही. त्यामुळे पालकांनी सतर्क राहून याकडे लक्ष दिले पाहिजे.

श्री. सुमित सागवेकर

२. मुलांना रामायण, महाभारत या मालिका भ्रमणभाषऐवजी दूरचित्रवाणीवर दाखवा !

‘पाल्यांना रामायण, महाभारत आणि श्रीकृष्ण यांसारख्या मालिका पहाण्यास दिल्यानंतर त्यांच्यावर चांगले संस्कार होतील’, असे पालकांना वाटते; परंतु यू ट्यूबवर एक ठराविक व्हिडिओ लावल्यानंतर खाली येणारे अन्य व्हिडिओज् दिसत असतात. त्यामध्ये हिंसक, अश्‍लील आणि अनावश्यक व्हिडिओज्ही असतात. ते पाहून मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. याकडे पालकांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे पाल्यांना रामायण, महाभारत इत्यादी मालिका दाखवायच्या असतील, तर दूरचित्रवाणीवर दाखवा. तुमच्या भ्रमणभाषची जोडणी दूरचित्रवाणीला जोडून स्वतः चालू करून द्या. त्यांना चांगले ग्रंथ वाचण्याची सवय लावा. मुले लहान असतील, तर त्यांना गोष्ट सांगा; पण भ्रमणभाष नावाच्या राक्षसापासून मुलांना दूर ठेवा.

३. मुलांनो, ‘भविष्यात ‘कार्टून’ व्हायचे कि छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप व्हायचे ?’, याचा विचार करा !

आजकाल बहुतेक मुले ‘कार्टून’ पहातात. कार्टून काल्पनिक असतात. ना त्यातून ज्ञान वाढते, ना धर्मशिक्षण मिळते, ना शौर्यजागृती होते. त्यातून केवळ मनोरंजन होते. यामुळे मुलांचे व्यक्तीमत्त्व खुंटते. त्यामुळे पालकांनी तर विचार करायलाच हवा; पण पाल्यांनीही विचार करायला हवा. ‘आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी, स्वा. सावरकर, स्वामी विवेकानंद, रणझुंजार बाजीप्रभु, नरवीर तानाजी, वीर शिवा व्हायला आवडेल कि ‘कार्टून’ व्हायला आवडेल ?’, हे आजच ठरवा आणि आपल्या जीवनाचे ध्येय निश्‍चित करा.

४. ‘भ्रमणभाषच्या वापरामुळे मुलांच्या स्वभावामध्ये होणार्‍या पालटांकडे कटाक्षाने लक्ष देणे’, ही पालकांची साधनाच आहे !

काही वेळा भ्रमणभाषच्या योग्य वापरामुळे पाल्यांमध्ये ‘सामाजिक माध्यमांचा उपयोग राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी करणे, पालकांना भ्रमणभाष शिकवण्यासाठी साहाय्य करणे’ इत्यादी चांगले पालटही झालेले असू शकतात. याउलट ‘भ्रमणभाष हाताळतांना कुणी काही विचारले, तर त्यांच्यावर खेकसून, चिडचिड करून बोलणे, समोरच्या व्यक्तीचा मान न राखणे, भ्रमणभाष ठेवण्यास सांगितल्यास प्रतिक्रियात्मक बोलणे’, असे काही नकारात्मक पालट पाल्यांमध्ये झालेले आढळून येतात. काही युवकांना तर भ्रमणभाषचे व्यसन लागलेले आहे. ‘असे आपल्या पाल्याच्या संदर्भात नाही ना ?’, याकडे प्रत्येक पालकाने कटाक्षाने लक्ष देणे’, ही आपली साधनाच आहे.

५. पाल्यांकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया अन् नामजपादी साधना करवून घेण्यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवेत !

‘येणारा आपत्काळ आणि युद्धकाळ यांमध्ये भ्रमणभाष बंद झाले, तर अशा पाल्यांचे काय होणार ?’, याचा विचार आजच केला नाही, तर ‘अशी मुले मोठ्या मानसिक धक्क्याला बळी पडू शकतात’, हे गांभीर्याने लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आपल्या पाल्यांकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया अन् नामजपादी साधना करवून घेण्यासाठी आपण आजपासूनच प्रयत्न केले पाहिजे. काही साधकांच्या मुलांना हातात भ्रमणभाष दिल्याविना जेवण जात नाही. ‘हे शरिराला लाभदायक ठरेल का ?’, याचा विचार करणे आवश्यक आहे. काही लहान मुले जेवणाच्या आणि अन्य वेळीही भ्रमणभाष हातात दिला नाही किंवा त्यांच्या मनानुसार दूरचित्रवाणीवर कार्यक्रम लावला नाही, तर ‘भूमीवर पाय आपटणे, मोठ्याने रडणे, पांघरूण अंगावर घेऊन झोपणे, उलट उत्तरे देणे’, असे प्रकार करतात. ‘पाल्यांना साधना आणि स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करायला न शिकवून आपण त्यांची हानी करत आहोत’, याचे भान ठेवून आपण गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना करण्याचा प्रयत्न करूया.

काही पालक ‘त्यांचे दैवी बालक असलेले पाल्य चुकीचे वागणार नाही’, असे गृहित धरतात. काही दैवी बालके आपल्या पालकांना उलट बोलत असल्याचे आढळले. काही दैवी बालकांची प्रगल्भता अधिक असल्याने ती लहान वयातच मोठ्यांसारखी वागायला लागतात. त्यामुळे त्यांच्यातील शिकण्याची स्थिती न्यून होऊन शिकवण्याची स्थिती वाढते. दैवी बालकांमध्ये साधकत्व असतेच; पण स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवली नाही, तर त्यांच्यातील स्वभावदोष उफाळून येतात. मागे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये एक चौकट प्रसिद्ध झाली होेती. त्यामध्ये दैवी बालकांना हाताळतांना ‘त्यांची स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करवून घेणे आणि त्यांना हाताळणे’ यासंबंधी सूचना होती. त्यानुसार आपण आपल्या दैवी बालकांना हाताळावे आणि पाल्यांना साधनेच्या पुढील टप्प्यात जाण्यास साहाय्य करावे.

६. पाल्यांना शिक्षा करण्याच्या संदर्भात पालकांची अयोग्य विचारप्रक्रिया आणि शिक्षा न केल्याने पाल्यांना पालकांचा धाक न रहाणे

आधीच्या काळात किंवा माझ्या लहानपणी ‘खेळण्याच्या वेळा, अभ्यास, मोठ्यांशी वागणे-बोलणे, समाजात कसे वागावे ? कसे वागू नयेे ?’, यासंदर्भात शिस्त लावतांना जेव्हा मी ऐकायचो नाही, त्या वेळी पालकांनी मला ‘ओणवे उभे करणे, घराच्या बाहेर उभे करणे’ अशा प्रकारच्या शिक्षा केल्या; म्हणून माझ्यावर चांगले संस्कार झाले आणि मला शिस्त लागली.

आता काही पालकांना त्यांच्या पाल्याच्या चुका सांगितल्यास राग येतो; पण शिक्षा करण्याचा उद्देश पालकांकडून लक्षात घेतला जात नाही. काही पालकांना ‘आमचे पाल्य भ्रमणभाष किती सराईतपणे वापरते ? त्याला त्यातील सर्व कळते’, यात मोठेपणा वाटतो. तसे कौतुक ते सर्वांना सांगतात. त्यामुळे सध्याची ८० टक्के पाल्ये लाडावलेली असल्याचे लक्षात आले. त्यासंदर्भात मुलांनी ऐकले नाही, तर अधिकाधिक मुलांना पालक केवळ समजावतात. शिक्षा न केल्यामुळे पाल्यांना पालकांचा धाक राहिला नाही.

७. कुसंस्कारी मित्र-मैत्रीण यांच्या संगतीने पाल्यांनी अयोग्य कृती करणे

समाजातील काही मुले कुसंस्काराने वागतात. अशा पाल्यांची संगत लाभल्यानेही आपल्या पाल्याची पुष्कळ मोठी हानी होऊ शकते. ‘सोशल मिडियावर मित्र कसे करायचे ? ‘चॅट’ कसे करायचे ? ‘फ्रेंडशिप’ (मैत्री) करणे, ‘लव्ह’ म्हणजे काय ? ‘बॉयफ्रेंड’, ‘गर्लफ्रेंड’ म्हणजे काय ?’ ही उदाहरणे सर्वसामान्य आहेत; पण याहीपेक्षा भयंकर स्थिती प्राथमिक शाळेतील मुलांची मी प्रत्यक्ष पाहिली आहे.

शाळेतून घरी जातांना गुटखा, तंबाखू आणि सिगारेट ओढणारी मुलेही आढळून येतात. महाविद्यालयात हीच मुले मद्याच्या नशेत धुंद असतात. युवकांच्या संदर्भात ‘फ्लर्ट’ करणे म्हणजे एकमेकांचा केवळ उपभोग घेणे’, हा भाग आताच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये ४० ते ५० टक्के मुलांच्या संदर्भात आढळून येतो. ‘अश्‍लील व्हिडिओ बघणे, हिंसक गेम खेळणे’, अशी सर्व लक्षणे या आधुनिक म्हणवणार्‍या काही पाल्यांमध्ये आढळून येत आहेत. अशा एखाद्या मित्राची किंवा मैत्रिणीची संगत आपल्या पाल्याला मिळाली, तर आपल्याला ‘आपले पाल्य कधी वाया गेले ?’, हे कळणारही नाही. ‘एखादे छोटे लक्षणही आपल्या पाल्यामध्ये उग्र रूप कधी धारण करेल ?’, हे सांगता येत नाही.

साधकांनी आपल्या मुलांना सात्त्विक आणि साधे रहाण्याची सवय लावलेली असते. बाहेरील मुलांचे किंवा मुलींचे बघून मुलांना ‘जीन्स, टी-शर्ट; ‘लो वेस्ट’ (कमरेखाली आलेली), मांडीवर फाटलेली, रंग उडालेली पँट’ असे कपडे घालावेसे वाटतात. मुलींमध्ये ‘लिपस्टिक लावणे, नटायला-मुरडायला आवडणे, नखे वाढवणे, स्कर्ट घालणे, मोठ्या गळ्याचे कपडे शिवणे, फॅशनच्या नावाखाली अंगप्रदर्शन करणे’, अशी लक्षणे आढळून येतात. आपल्याही मुलांच्या मनात कुसंस्कारी मुलांच्या संगतीत राहून तसे विचार चालू होतात आणि ती तसे रहाण्याचा प्रयत्न करतात.

८. मुलांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी समर्पित होणे अन् आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक असणे

आपला मुलगा राष्ट्र आणि धर्म यांसाठी समर्पित झाला, तर काय होते ? प्रत्येक पालकाने हा प्रश्‍न आपल्या मनाला विचारावा. प्रश्‍न विचारल्यावर ‘पण’, ‘किंतु’, ‘परंतु’ मनात आला असेल, तर ‘आपण अजूनही न्यून पडत आहोत’, हे लक्षात घ्यावे. ‘मुलाने घरातच शौर्य दाखवावे’, असे वाटत असेल, तर आपण आपल्या मुलाची पुष्कळ मोठी हानी करत आहोत. ‘घरात राहूनच मुलाने सेवा करावी’, असे वाटणे म्हणजे ‘फावल्या वेळेत साधना करा’, असे सांगणे होय; पण ‘साधना हा ‘पार्ट टाइम जॉब’ नव्हे !’, अशी चौकट दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्याचा विचार करायला हवा. ‘त्याग’ आणि ‘समर्पण’ ही उत्तम शिष्याची लक्षणे आहेत. हे थोडे जड आहे; पण याचा विचार कधीतरी आपल्याला करावाच लागणार, तर मग आता का नको ? विचार करून तर बघूया.

केवळ आपल्या पाल्यांच्या संदर्भात नाही, तर ‘आपली सून, पती, पत्नी यांच्या संदर्भात आपले विचार काय आहेत ?’, याचेही चिंतन आपण करूया. ‘प्रकृतीनुसार आणि आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी साधना करा’, असे त्रिकालदर्शी श्री गुरु आपल्याला सांगत आहेत. अध्यात्म, राष्ट्र, धर्म आणि व्यष्टी साधना ही सर्व श्री गुरूंचीच रूपे आहेत. या मार्गाने झोकून देऊन प्रयत्न करायला हवेत. भावनिक विचार करून आपण स्वतःच्या, कुटुंबियांच्या आणि पाल्यांच्या साधनेत अन् गुरुसेवेत अडथळा निर्माण करायला नको.

९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ज्ञानशक्ती, धर्मशक्ती, राष्ट्रशक्ती आणि अध्यात्मशक्ती यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी कटीबद्ध होऊया !

संपूर्ण विश्‍वाला मोक्षाचा मार्ग दाखवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ज्ञानशक्ती, धर्मशक्ती, राष्ट्रशक्ती आणि अध्यात्मशक्ती यांचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. त्यामुळे गुरुचरणी नतमस्तक होऊन आज वचनबद्ध होण्याची हीच वेळ आहे. श्री गुरु समर्थ आहेत. त्यांच्यावर श्रद्धा ठेवून आज त्यांच्या चरणी वचनबद्ध होऊन त्यांना सांगूया, ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा !’

एक मुलगी आपल्या वडिलांशी उद्धटपणे बोलत असतांना मी पाहिले. तेव्हा मला वाईट वाटले. त्या वेळी माझ्या गुरुमाऊलीला मी आर्ततेने हाक मारली, ‘असे का गुरुदेवा ?’ आणि त्यानंतर गुरुदेवांनी हा लेख लिहिण्यास सुचवले. ‘गुरुदेवा, ‘तो तुमच्या चरणी समर्पित करवून घ्या’, हीच तुमच्या पावन चरणी कृतज्ञतापूर्वक प्रार्थना !’

– श्री. सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती. (३.११.२०२०)

घनघोर युद्धातही अर्जुन केवळ कृष्णमय ।

कृष्णाच्या अर्जुनाचे रोम रोम कृष्णमय ।
कर्म तयाचे कृष्णमय, चित्त अर्जुनाचे कृष्णमय ॥ १ ॥

ध्यानात कृष्णमय, अर्जुन निद्रेतही कृष्णमय ।
सुखात कृष्णमय अन् दुःखातही कृष्णमय ॥ २ ॥

आनंदात कृष्णमय, अर्जुन संकटात कृष्णमय ।
रणांगण असो वा अंतर्मन ।
त्या घनघोर युद्धातही अर्जुन केवळ कृष्णमय ॥ ३ ॥

अर्जुनभावाने मोक्षसारथी श्रीकृष्णाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

– श्री. सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती. (११.८.२०२०)