परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

वर्ष २०२० मधील ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोेत्सवाच्या वेळी साधकांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी वेळोवेळी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावरील चित्रफीत दाखवण्यात आली. त्यातील सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.

१. आध्यात्मिक प्रगती झाल्यावर ईश्‍वरच आपल्या मुखातून बोलवून घेतो !

साधक : आज सकाळपासून ‘आज आपली भेट होईल’, असे मला वाटत होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : किती प्रगती आहे ना !

पूर्वसूचना (इन्ट्यूशन) मिळाली. पुष्कळ छान !

साधक : आज सकाळी बेळगावहून निघाल्यावर मी माझ्या भावाला समजावून सांगत होतो. तेव्हा गुरुदेव, ‘आपणच माझ्याकडून बोलवून घेत आहात’, असे मला वाटत होते. माझा भाऊ पुष्कळ तर्कसंगत विचार (लॉजिकल थिंक) करतो. मी त्याला सांगू इच्छित होतो, ‘असेसुद्धा होऊ शकते.’

परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘लॉजिकल थिकिंग’ म्हणजे बुद्धीप्रामाण्यवाद हं. त्याला काही किंमत नसते.

साधक : तेव्हा मी स्वतः आचरणात न आणलेली सूत्रे माझ्या मुखातून बाहेर पडत होती. मी भावाला सांगत होतो, ‘‘तुम्ही प्रथम सांगितलेले आचरणात आणा.’’ अध्यात्मशास्त्रात केवळ अनुभूतीला अधिक महत्त्व आहे. रामनाथी आश्रमात आल्यानंतरसुद्धा भाऊ मला प्रश्‍न विचारत होता. तेव्हा मी म्हणालो, ‘‘तू एकदा तरी अनुभवून बघ. तुला पुष्कळ उत्तरे आपोआप मिळतील.’’ तेव्हा मला वाटत होते, ‘हे सर्व आपल्याकडूनच (परात्पर गुरु डॉक्टरांकडून) येत आहे.’ ‘हे कसे झाले ?’, हे मला ठाऊक नाही. आपणच ते सांगावे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : अध्यात्मशास्त्र हे अनंताचे शास्त्र (सायन्स ऑफ इन्फिनिटी) आहे. ते वाचून कोण किती लक्षात ठेवणार ? साधनेत जेव्हा प्रगती होते, तेव्हा मनात भाव असतो. त्या वेळी जे बोलणे आवश्यक आहे, ते ईश्‍वर आपल्या मुखातून बोलून घेतो.

२. मन, बुद्धी अन् अहं नष्ट झाल्यावर विश्‍वमन अन् विश्‍वबुद्धी यांच्याशी जोडता येते

परात्पर गुरु डॉ. आठवले : साधना करता करता मन नष्ट झाले, स्वभावदोष, अहं आणि बुद्धी नष्ट झाली की, ‘अभ्यास करणे’ हेसुद्धा नष्ट होते. तेव्हा विश्‍वमन, विश्‍वबुद्धी, म्हणजे ईश्‍वराचे मन आणि बुद्धी यांच्याशी अनुसंधान असते. बोलता बोलता यांच्या (साधकाच्या) वाणीतून अगदी योग्य उत्तर आले. त्या क्षणी त्यांचे ईश्‍वराशी अनुसंधान होते. त्यामुळे असे झाले.

३. ज्ञानयोग, भक्तीयोग अशा कोणत्याही मार्गाने साधना केल्यावर मन, बुद्धी, चित्त आणि अहं नष्ट झाल्यानंतरच सच्चिदानंद अवस्था प्राप्त होते !

साधक : आपण सांगितल्याप्रमाणे जर आम्ही विशिष्ट आध्यात्मिक पातळीपर्यंत पोचू शकलो, तर आमच्या देहावसानानंतर आम्ही भगवंताशी एकरूप होऊ. त्यानंतर आमचे कार्य कसे राहील ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : भगवंताशी एकरूप झाल्यानंतर कार्य असे वेगळे रहातच नाही. सच्चिदानंद अवस्था असते. पावसाचा एक थेंब पडतो आणि सागरात जातो, तर कार्य काय करतो ?

साधक : मीलन होऊन जाते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : हो.

साधक : जेथून मी प्रत्यक्षात आलो, त्या संदर्भात मी घेतलेले ज्ञान कुठे जाते कि तेथून हालचालीला आरंभ होतो ? कारण ‘मृत्यू केवळ आरंभ आहे (डेथ इज जस्ट द बिगिनिंग) आणि तेथे प्रत्येक वेळी आपण भगवंतासह वेगवेगळ्या लीलांमध्ये सहभागी होऊ शकतो. त्याच्यासह प्रत्येक भावात, प्रत्येक रसात आपण आनंद लुटू शकतो आणि त्याच्यासह प्रत्येक कृती आपण आपल्या हिशोबाने करू शकतो’, असे ‘इस्कॉन’मध्ये सांगितले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : साधना करतांना ५० टक्के आध्यात्मिक पातळीला ‘साधना करावी, करू नये’, असे मनात द्वंद्व रहाते. ६० टक्के आध्यात्मिक पातळीला मन नष्ट होण्यास, म्हणजे मनोलय होण्यास आरंभ होतो. तेव्हा साधना चांगली होते. नंतर ७० टक्के आध्यात्मिक पातळीला मन पूर्ण नष्ट होते. ८० टक्के आध्यात्मिक पातळीला बुद्धी नष्ट होते. ९० टक्के आध्यात्मिक पातळीला जेथे जन्मोजन्मीचे संस्कार आहेत, ते चित्तच नष्ट होऊन जाते आणि १०० टक्के आध्यात्मिक पातळीला ‘मी ईश्‍वरापासून वेगळा आहे’, हा विचारसुद्धा नष्ट होऊन जातो. कोणत्याही मार्गाने, म्हणजे ज्ञानयोग, भक्तीयोग यांनी गेलो, तरी असेच होते.

साधक : हो. त्यानंतर द्वैत रहात नाही. केवळ एकच होऊन जातो. ‘ब्रह्मज्योती वेगळी आहे आणि आपण वेगळे आहोत’, असे म्हटले जाते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : हो. ६०, ७०, ८० टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत तेच होते. १०० टक्के आध्यात्मिक पातळीला आत्मज्योत ब्रह्मज्योतीत विलीन होऊन जाते. अधिक वाचन केले नाही, तर चांगले असते. नाहीतर असे सहस्रो प्रश्‍न मनात येतात. व्यक्ती त्यातच अडकून पडते.’