मुंबई – राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री, तसेच काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी स्वतः केलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवल्याने त्यांचे पारपत्र नागपूर पारपत्र विभागाने कह्यात घेतले आहे. वडेट्टीवार यांनी पारपत्र अर्जात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करणारी याचिका विधान परिषदेचे माजी सदस्य मितेश भांगडीया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात प्रविष्ट केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर पारपत्र कार्यालयाने कागदपत्रांची पडताळणी करून वडेट्टीवार यांना प्रत्यक्ष बोलावले, तेव्हा वडेट्टीवार यांनी त्यांचे पारपत्र जमा केले होते. ते पारपत्र आता कह्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी आता नागपूर पारपत्र कार्यालय चौकशी करत आहे. ‘माझ्यावर कोणताही गंभीर गुन्हा नोंद नसून जे चार गुन्हे नोंद आहेत, ते किरकोळ राजकीय गुन्हे आहेत’, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.