प्रामाणिक, कष्टाळू आणि श्री गुरूंप्रती उत्कट भाव असलेले सुलाभाट येथील श्री. ओमू गावस !

प्रामाणिक, कष्टाळू आणि श्री गुरूंप्रती उत्कट भाव असलेले सुलाभाट (तिसवाडी, गोवा) येथील श्री. ओमू गावस (वय ७८ वर्षे) !

‘श्री. ओमू गावस हे ‘सुलाभाट कृषीविद्या’चे कृतीशील सदस्य आहेत. ते सुलाभाट येथील जुने साधक आहेत. ते गेली २० वर्षे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. मला जाणवलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. ओमू गावस

१. कष्टाळू

श्री. ओमू कसत असलेल्या शेतभूमीचे मालक कै. नरसिंह कुकळकर यांनी ते करत असलेली भातशेतीची लागवड बंद केली आणि ओमू यांना सांगितले, ‘‘आता मला भाताची लागवड करणे जमत नाही. तू भातशेती कर.’’ त्यानंतर ओमू यांनी भातशेती केली आणि मालकाला खंडही दिला. अलीकडे गेली ६० वर्षे ते भाजीची लागवड करत आहेत.

२. सतर्कता

त्या शेताभोवती बांध आहे. मालकाने शेताच्या बांधासाठी २ सहस्र रुपये कर्ज काढले. ते कर्ज फेडता न आल्याने मालकाने ‘बांध विकायचा’, असे ठरवले. तेव्हा ‘शेती करायला अडचण येऊ नये’, या दृष्टीने श्री. ओमू यांनी तो बांध मालकाने सांगितल्याप्रमाणे लगेच विकत घेऊन स्वतःच्या नावावर करून घेतला. त्यांनी बांधावर नारळीची झाडे लावली आणि तेथे एक छोटेसे घरही बांधले.

३. प्रामाणिकपणा

भूमीमालक वारल्यानंतर काही स्थानिक लोकांनी ओमू यांना शेतभूमी स्वतःच्या नावावर करून घेण्याविषयी सांगितले; पण ओमू यांनी त्यांना सांगितले, ‘‘मला माझ्या श्री गुरूंनी दुसर्‍यांना लुबाडायची शिकवण दिली नाही. योग्यच वागायची दिशा दाखवली आहे.’’

४. स्थानिक लोकांसाठी सत्संग चालू करणे

शेताच्या बांधावरील घरात त्यांनी सप्तदेवतांची मांडणी केली आहे. तेथून त्यांचे रहाते घर अर्धा कि.मी. दूर आहे; पण ते प्रतिदिन पहाटे ५ वाजता घरातून बांधावरच्या घरी येऊन पूजा करतात आणि नंतर घरच्या देवांची पूजा करतात. बांधावरच्या घरी त्यांनी सनातन संस्थेचा सत्संग चालू केला आहे. त्यामुळे बांधाजवळचे स्थानिक लोक तेथे प्रतिदिन सकाळ-संध्याकाळ नामजपाला बसतात. कधी कधी तेथे साधकांचा सत्संगही होतो. त्यांनी तेथे एक भजनी मंडळही चालू केले आहे. तेथे येणार्‍यांना ते साधनेचे महत्त्व सांगतात. त्यांच्या या घरात चैतन्य जाणवते.

५. सेवाभाव

गुरुपौर्णिमेचा प्रसार, पंचांग वितरण, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण, सात्त्विक वस्तूंचे वितरण, अशा जमेल त्या सेवा ते आतापर्यंत करत आले आहेत. या वयातही त्यांचा सेवेचा उत्साह दांडगा आहे. आता कोरोनामुळे दळणवळण बंदी असली, तरी त्यांनी नातेवाइकांमध्ये २५ पंचांगांचे वितरण केले आहे.

६. शेतात झालेली भाजी प्रथम रामनाथी आश्रमात पाठवणे आणि ‘सर्व श्री गुरूंचेच आहे’, असा भाव असणे

हिवाळ्यात ते मुळा, लाल भाजी, वांगी, रताळी अशा भाज्यांची लागवड करतात. शेतात झालेली भाजी ते प्रथम रामनाथी आश्रमात पाठवतात. आश्रमाची गाडी आली असेल, तर गाडीच्या समवेत पाठवतात आणि नसेल तर, स्थानिक साधकाला घेऊन ते आश्रमात जाऊन भाजी देऊन येतात. ‘सारे श्री गुरूंचेच आहे’, असा त्यांचा भाव आहे. साधनेत आल्यापासून प्रतिवर्षी ते अगत्याने आश्रमात भाजी अर्पण करतात आणि स्थानिक साधकांनाही भाजी देतात.

७. गुरुकृपेची आलेली अनुभूती

७ अ. शेतभूमीच्या मालकाच्या मुलाने शेत विकायला काढणे, त्या वर्षी मेहनत न करताच भाताचे पीक दुप्पट येणे आणि त्यानंतर शेतभूमीच्या मालकाच्या मुलाने भूमीची विक्री न करणे : वर्ष २०१७ मध्ये शेतमालकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या धाकट्या मुलाने ‘तू शेत लावू नकोस. इथून पुढे मी शेत लावणार आहे’, असे ओमू यांना सांगितले आणि त्याने शेत विकायला काढले. त्या वर्षी मेहनत न करताच भाताचे पीक दुप्पट आले. ‘हे कसे झाले ?’, असे सर्वच स्थानिक लोकांना आश्‍चर्य वाटले. तेव्हा ओमू म्हणाले, ‘‘ही सर्व गुरुमाऊलीची कृपा आहे.’’ त्यानंतर ओमू यांनी शेतमालकाच्या मुलाला सांगितले, ‘‘तुला ही भूमी दुसर्‍याला विकता येणार नाही. तुला विकायचीच असेल, तर मी घेतो आणि तुला शेतात लागवड करायची असेल, तर अर्धी तू कर आणि अर्धी मी करतो.’’ त्यानंतर शेतमालकाच्या धाकट्या मुलाने शेताची विक्री केली नाही. आता दोघेही लागवड करतात. श्री. ओमू यांना त्यांच्यातील उत्कट भावामुळे ही मोठीच अनुभूती आली.

‘गुरुदेव, तुम्हीच माझ्याकडून ही सूत्रे लिहून घेतलीत, त्यासाठी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. दुर्गादास फडते, शिरदोन, पाळे, तिसवाडी, गोवा. (१.१२.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक