परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

वर्ष २०२० मध्ये झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी ऑनलाईन पद्धतीने दाखवलेल्या ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावर परात्पर गुरु डॉक्टरांशी साधकांच्या झालेल्या भेटींच्या वेळच्या चित्रफितींमधील संवाद येथे देत आहोत.

(भाग १)

१. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेचे महत्त्व

१ अ. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेचे महत्त्व स्वयंसूचनेद्वारे मनाला समजावल्यावर प्रत्यक्ष कृती होऊन आध्यात्मिक उन्नती होते !

साधक : परात्पर गुरुदेव, माझ्यामध्ये पुष्कळ अहं आणि स्वभावदोष आहेत. ते न्यून करण्यासाठी आणि अहं नष्ट करण्यासाठी मी काय करू ?

परात्पर गुरु डॉ. आठवले (साधकाच्या मुलाला) : त्यांना सांगितले नाही का ? स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या संदर्भातील ग्रंथ त्यांना दिले नाहीत का ?

मुलगा : त्यांनी त्या ग्रंथांचा अभ्यास केला; परंतु त्यांना ते कृतीत आणायला जमत नाही. ‘अडथळा (ब्लॉक) नक्की कुठे आहे ?’, हे लक्षात येत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले : यात अडथळा (ब्लॉक) नाही. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व काय आहे ?’, हे त्यांना नीट समजले नाही. समजा, एखाद्याला मधुमेह (डायबिटीस) आहे आणि त्याला ‘इन्सुलिन’ घ्यायचे आहे. एकदा रात्री घरी आल्यावर त्याच्या लक्षात येते, ‘अरे, घरात उद्या सकाळी घेण्यासाठी ‘इन्सुलिन’ शिल्लक नाही.’ तर तो काय करील ? ‘औषधाचे कोणते दुकान उघडे आहे ?’, हे तो शोधत जाईल; कारण त्याला त्याचे महत्त्व ठाऊक आहे. तुम्ही ज्या स्वयंसूचना देता, त्यात ‘स्वभावदोष आणि अहं जोपर्यंत जात नाहीत, तोपर्यंत उन्नती होणार नाही’, असा उल्लेख करा. हे महत्त्व मनावर बिंबवणारी स्वयंसूचना १५ दिवस किंवा एक मास देत रहा. नंतर अंतर्मन (चित्त) यांना त्याचे महत्त्व लक्षात येईल आणि त्यानंतर तुम्ही पुढे पुढे जाल. ही एवढी लहानशी गोष्ट आहे.

१ आ. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केल्यावर नामजप एकाग्रतेने होऊन साधनेत पुढे जाता येते !

साधक : नामजपावर मन कसे एकाग्र करायचे ?; कारण जेव्हा मी नामजप करायला बसतो, तेव्हा मला त्यात रुची वाटत नाही. ही गोष्ट आतून खेद उत्पन्न करते; कारण भगवंताला भेटण्याची आणि त्याच्या दर्शनाची आतमध्ये पुष्कळ तीव्र ओढ आहे. गेल्या १६ वर्षांपासून माझ्याकडून हीच प्रार्थना होत आहे; परंतु माझ्याकडून काहीच होत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘नामजपावर मन एकाग्र होणे’, हे साध्य आहे, साधन नाही. समजले ना ? आपल्यामध्ये जे स्वभावदोष आणि अहं आहेत, त्यामुळे मन एकाग्र होत नाही. जेव्हा आपण स्वभावदोष आणि अहं दूर करतो, तेव्हा साधनेत पहिले पाऊल ठेवतो. त्यासाठी येथे (सनातन संस्थेमध्ये) सर्व स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यालाच प्रथम प्राधान्य आहे. हा पाया (बेस) पक्का असेल, तरच साधक आपल्या प्रकृतीनुसार कोणत्याही मार्गाने, म्हणजे ध्यानयोग असो, भक्तीयोग असो, कर्मयोग असो, कुंडलिनीयोग असो, शक्तिपातयोग असो, पुढे जातो. समजा, कुणी आजारी असेल आणि म्हणाला, ‘मला लढायचे आहे, धावायचे आहे’, तर आपण म्हणतो, ‘अरे, आधी तुझा आजार तरी बरा होऊ दे. नंतर तू हे सर्वकाही करू शकशील.’ त्याच प्रकारे स्वभावदोष गेले, तरच साधनेत पुढे पुढे जाता येते.

१ इ. घरामध्ये पती-पत्नी यांनी एकमेकांकडे साधकाच्या रूपात बघून मनाला योग्य दृष्टीकोन दिल्यास स्वभावदोष शीघ्रतेने उणावतात !

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुमचे नशीब चांगले आहे. तुम्हाला पत्नीसुद्धा चांगली मिळाली आहे ना ? नाहीतर घराघरात नेहमी भांडणेच होतांना दिसतात.

साधक : एकमेकांना साथ देत आम्ही चांगली साधना कशा प्रकारे करू शकतो ? कारण त्या सूत्रावरूनसुद्धा आमच्यामध्ये पुष्कळ भांडण होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘कसे करायचे ?’, एवढेच ना ? ‘साधक आहोत’, असे रहाता का ? पती-पत्नीप्रमाणे नाही, तर साधकासारखे आपले वागणे असले पाहिजे. आपल्याला ईश्‍वरप्राप्ती करायची आहे. एकमेकांना स्वभावदोष सांगा; परंतु बोलण्याची भाषा चांगली असली पाहिजे; नाहीतर भांडण चालू होते.

साधक : एकदा आम्ही भिंतीवर कागद चिकटवला. त्यावर लिहिले, ‘आज आपण क्रोधावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करूया.’ त्यावरून आमचे २ – ३ दिवस भांडण झाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले : तो कागद पाहूनच क्रोध आला का ?

साधक : प्रतिदिन आम्हाला एकमेकांना संकेत करून चुका दाखवून देणेसुद्धा पुष्कळ कठीण झाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले : प्रयत्नांसाठी ‘क्रोध’ हा स्वभावदोष न घेता क्रोध येणार्‍या काही प्रसंगांची उदाहरणे घ्यायची. एकेक उदाहरण घ्यायचे. अशी ८ – १० उदाहरणे घेत एकेका प्रसंगात जिंकले, तर स्वभावातील तो दोष एकदम न्यून होऊन जातो. ‘या प्रसंगात मला राग येतो, तर त्या प्रसंगात माझी प्रतिक्रिया कशी असायला पाहिजे ?’, हे मनाला समजावून सांगायला हवे. त्यानंतर क्रोध नष्ट होतो.

साधक : ती (पत्नी) स्वत:च्या स्वभावदोषांवर पुष्कळ प्रयत्न करते. तिचे प्रयत्न पाहिल्यावर मला वाटते, ‘एवढ्या सर्व चुका आणि एवढे अहंचे पैलू ती लिहू शकत असेल, तर माझ्यामध्ये किती असतील ?’ किंवा मला वाटले, ‘मी तिच्यासह एकटाच रहातो. स्वभावदोषांच्या संदर्भात जेवढ्या  चुका असतील, त्या माझ्याविषयीच असतात.’ मला समजले, ‘जर मी एका दिवसात माझ्या ५ चुका लिहित असेल, तर ती १५ चुका माझ्याविषयीच लिहिते.’

परात्पर गुरु डॉ. आठवले : एकमेकांच्या चुकासुद्धा लिहिता ना ?

साधक : हो; परंतु आमच्यामध्ये एवढा मनमोकळेपणा नाही की, आम्ही एकमेकांशी याविषयी काही बोलू शकतो किंवा यापूर्वी कधी बोललो असू.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आता कुठे आरंभ झाला आहे. आध्यात्मिक पातळी वाढत गेल्यावर मनमोकळेपणा येतो. अरे, तुम्ही कुणापासून लपवता ? भगवंत तर सर्वकाही जाणतो. मग एकमेकांपासून चुका लपवण्यात काय लाभ आहे ? आपण तर साधक आहोत ना ? त्यामुळे साधक एकमेकांना चुका मनमोकळेपणाने सांगतात. तसे बोलणे हीच आपली साधना आहे. ‘समोरचा साधक किंवा साधिका आहे’, असा आपला दृष्टीकोन असायला पाहिजे. त्यासाठीसुद्धा स्वयंसूचना द्यायला पाहिजे.

जे हिमालयात तपश्‍चर्येसाठी एकटे जातात, त्यांची आध्यात्मिक उन्नती म्हणावी तितकी होत नाही; कारण तेथे त्यांचे स्वभावदोष सांगणारे कुणी नसते. ते एकटेच रहातात ना ! हिमालयात जाऊन ५० – ६० वर्षे साधना केली आणि नंतर हरिद्वारला, म्हणजे समाजात आले, तर त्यांचा क्रोध बाहेर पडू लागतो; कारण त्यांची परीक्षाच होत नाही. परिवारात ‘क्रोध येतो का ?’, याविषयी आपली प्रतिदिन परीक्षा असते.

दुसरा साधक : आईने वडिलांना सांगितले आहे की, तुम्ही मला पत्नी म्हणून नाही, तर एका साधिकेसारखे बघा; परंतु तसे होत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले : त्यांना पत्नी म्हणून पाहू नका. पुरुषांमध्ये अहं असतो की, मी घराचा अधिकारी (बॉस) आहे. प्रत्येक घरात हीच गोष्ट आहे. आपल्याला हे कधी अनुभवायला आले कि नाही ? नसेल, तर तुम्ही भाग्यवान आहात. अधिक जोर देऊ नका. एखाद्या गोष्टीचे महत्त्व लक्षात आले, तरच त्याप्रमाणे कृती होते. आपण दहा वेळा जरी बोललो, ‘असे करा, असे करा’, तर तसे होत नाही; कारण महत्त्वच वाटत नाही. ती गोष्ट त्यांच्या अंतर्मनापर्यंत पोचणे महत्त्वाचे असते. त्यानंतर ते ती कृती स्वतःहूनच आपोआप करू लागतील.

१ ई. अहं नष्ट झाल्यावर ईश्‍वराच्या जवळ जाणे सोपे होते !

साधक : मी माझ्या भावाला सांगत होतो, ‘जर साधनेत काही करायचे असेल, तर कुणाचे ना कुणाचे तरी ऐकावेच लागेल; नाहीतर ते स्वतःच्या मनानुसार होईल आणि मग कोणताच लाभ होणार नाही.’

परात्पर गुरु डॉ. आठवले : जो ऐकत नाही, त्याच्यामध्ये अहं असतो. तो प्रश्‍नावर प्रश्‍न विचारत रहातो. अहं नष्ट झाल्यावर ईश्‍वराच्या जवळ जाता येते. अहं आपल्याला ईश्‍वरापासून वेगळे ठेवतो. अहं नष्ट होताच ‘इदं ब्रह्म’, म्हणजे ‘हे सर्व ब्रह्म आहे’, याची अनुभूती येते.

(क्रमश: उद्याच्या अंकात)  

भाग २ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://sanatanprabhat.org/marathi/438535.html