शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान दोडामार्गच्या वतीने ३१ डिसेंबरला पारगड किल्ल्यावर १२० जणांचा खडा पहारा

३१ डिसेंबरला किल्ल्यावर अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी प्रयत्न

किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी प्रयत्न करणार्‍या शिवप्रेमींचे अभिनंदन ! जे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्या लक्षात येते, ते प्रशासनाच्या लक्षात का येत नाही ? प्रशासन गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी प्रयत्न का करत नाही ?

३१ डिसेंबरच्या रात्री पारगड किल्ल्यावर ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान दोडामार्ग’च्या वतीने कडक पहारा ठेवण्यात आला होता.

दोडामार्ग – ३१ डिसेंबरच्या रात्री पारगड किल्ल्यावर ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान दोडामार्ग’च्या वतीने कडक पहारा ठेवण्यात आला होता. ख्रिस्ती नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या निमित्ताने  किल्ल्यावर मेजवानी, मद्यपान, हिडीस कार्यक्रम, गडबड गोंधळ करू नये, यासाठी हा पहारा ठेवण्यात आला होता. पहारा देत असतांना व्याख्यान, देशभक्तीगीत, कीर्तन, जागर, गोंधळ आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान दोडामार्ग’चे कार्यवाह मंगेश पाटील, तसेच धारकरी प्रकाश गवस यांच्यासह जवळपास १२० जणांनी हा पहारा दिला.

अलीकडे ३१ डिसेंबरची रात्र ख्रिस्ती वर्षाला निरोप देण्यासाठी विविध कार्यक्रमांनी जागवली जाते. समुद्र किनारे, हॉटेल्स, मैदाने, तसेच गड-किल्ले यांचीही निवड केली जाते. काही ठिकाणी चांगल्या पद्धतीने, तर काही ठिकाणी हिडीस पद्धतीने गोंधळ घालणारे कार्यक्रम आयोजित होतात. असे कार्यक्रम पारगड या ऐतिहासिक किल्ल्यावर होऊ नयेत, यासाठी हा पहारा ठेवण्यात आला. अधिवक्ता शिवाजी देसाई यांचे शिवचरित्रावरील व्याख्यान, तसेच नवनाथ महाराज बोराडे यांचे कीर्तन आदी कार्यक्रम या वेळी झाले. मोर्ले येथील श्री सातेरीदेवी मंदिर परिसरातून गडावर जाण्यासाठी जो मार्ग आहे, तेथेही पहारा देण्यात आला होता. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावचे जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी भेट दिली.