भोसे (मिरज) येथील कांबळे कुटुंबियांनी घातले देशी गाईचे डोहाळे जेवण 

कांबळे कुटुंबियांनी घातलेले देशी गाईचे डोहाळे जेवण

मिरज – मिरज पंचायत समितीचे सदस्य कृष्णदेव कांबळे यांच्या आईवडिलांना मुलगी नव्हती. याची खंत त्यांना मनात नेहमी होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या ‘लक्ष्मी’ नावाच्या देशी गायीचा पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ केला आहे. या गायीचा १ जानेवारी या दिवशी कांबळे कुटुंबियांनी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला. या वेळी लक्ष्मीला २२० ग्रॅम चांदीची चेन करण्यात आली होती आणि आणि पाहुण्यांना निमंत्रण देऊन ५०० जणांना जेवण देण्यात आले.

या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील महिलांसह, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. लक्ष्मीला आवडणार्‍या सर्व खाद्यपदार्थांची या वेळी मेजवानी आणण्यात आली होती. या वेळी डोहाळे जेवण कार्यक्रमासाठी लागणारे लाडू, चकली, धपाटे, भात, लोणचे, पापड इत्यादी शाकाहारी पदार्थांसह लक्ष्मीच्या आवडीचे सर्व प्रकारचे वैरण, गवत आणण्यात आले होते. गायीच्या या डोहाळे जेवणाची सार्‍या पंचक्रोशीत चर्चा चालू होती.