गोव्यातील ऊस उत्पादकांच्या धरणे आंदोलनाला सांगे येथे प्रारंभ : भरपाईसाठी लेखी आश्‍वासन देण्याची मागणी

सांगे, २ जानेवारी (वार्ता.) – गोव्यातील ऊस उत्पादकांनी सांगे येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर २ जानेवारी या दिवशी धरणे आंदोलनाला प्रारंभ केला आहे. ‘धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत प्रतिटन उत्पादनावर सरासरी ३ सहस्र ६०० रुपये भरपाई देण्याचे लेखी आश्‍वासन सरकारने द्यावे’, या प्रमुख मागणीला अनुसरून ऊस उत्पादकांनी हे धरणे आंदोलन छेडले आहे. या धरणे आंदोलनात सुमारे २०० ऊस उत्पादकांनी सहभाग घेतला. ऊस उत्पादकांनी प्रारंभी सांगे शहरात मोर्चा काढला.

ऊस उत्पादकांच्या धरणे आंदोलनात स्थानिक अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनीही सहभाग घेतला. कृषीमंत्री तथा उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. ‘५ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्र्यांसमेवत याविषयी बैठक घेऊन हा प्रश्‍न सुटावा, यासाठी प्रयत्न करणार आहे’, असे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी ऊस उत्पादकांना सांगितले; मात्र ५ जानेवारीपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे ऊस उत्पादकांनी सांगितले.