आंध्रप्रदेशमध्ये आणखी एका मंदिरातील मूर्तीची तोडफोड !

मागील १९ मासांमध्ये मंदिरांवर १२० आक्रमणे : सीबीआय चौकशीची मागणी

  • आंध्रप्रदेश भारतात नाही, तर पाकिस्तानमध्ये आहे, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ठरू नये ! याविषयी केंद्रातील भाजप सरकारने हस्तक्षेप करत मंदिरांच्या रक्षणासाठी पाऊल उचलले पाहिजे, असे हिंदूंना वाटते !
  • भारतातील निधर्मी लोकशाहीमध्ये कुठल्याही राज्यात कधी मशीद किंवा चर्च यांवर आक्रमणे होत नाहीत, तर हिंदूंच्या मंदिरांवरच ती होतात, हे लक्षात घ्या !

राजमुंद्री (आंध्रप्रदेश) – ख्रिस्ती मिशनर्‍यांचा सुळसुळाट असणार्‍या राजमुंद्री जिल्ह्यात असलेल्या विघ्नेश्‍वर मंदिरामध्ये भगवान श्री सुब्रह्मण्येश्‍वर स्वामी यांची मूर्ती अज्ञातांकडून फोडण्यात आल्याची घटना ३१ डिसेंबरच्या रात्री घडल्याचे समोर आले. या मूर्तीचे दोन्ही हात तोडण्यात आले. ‘येथून कोणत्याही मौल्यवान साहित्याची चोरी झालेली नाही. याचा अर्थ केवळ मूर्तीर्ची तोडफोड करण्याचाच आरोपींना उद्देश होता’, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी सीसीटीव्हीचे चित्रीकरण पाहून विशेष पथक बनवले आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्यातील विजयनगरम् येथील श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या प्राचीन मूर्तीचे शिर अज्ञातांनी कापल्याची घटना घडली होती.

१. या घटनेनंतर आता भाजपने ‘राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी निष्क्रीय असून त्यांचा आरोपींना पाठिंबा आहे’, असा आरोप केला आहे.

२. जन सेना पक्षाचे प्रमुख आणि तेलुगु अभिनेते पवन कल्याण यांनी राज्यात गेल्या दीड वर्षांपासून मंदिरांवर होणार्‍या आक्रमणांच्या घटनांची केंद्र सरकारने सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

 (सौजन्य : NTV Telugu)

(वरील छायाचित्रे आणि व्हिडीओ प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक)

३. माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम्चे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांनी म्हटले की, जगनमोहन सरकारच्या राज्यात देवही सुरक्षित नाहीत. गेल्या १९ मासांमध्ये राज्यात मंदिरांवर आक्रमणाच्या १२० हून अधिक घटना घडल्या आहेत. नुकतेच पीठपूरम् येथील ६ मूर्तींची तोडफोड करण्यात आली. बेजवाडा कनक दुर्गा मंदिराच्या रथावरील ३ वाघांच्या मूर्ती फोडण्यात आल्या. अमरावती येथे मंदिराच्या रथाला आग लावण्यात आली; मात्र अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. सरकारने तेव्हाच कारवाई केली असती, तर पुढील घटना घडल्या नसत्या.