बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर गुन्हे शाखेची कारवाई !

पुणे – संक्रातीतील पतंगबाजीसाठी वापरल्या जाणार्‍या नायलॉन मांजाची बंदी असतांना छुप्या पद्धतीने विक्री करणार्‍या दोघांना बिबवेवाडी आणि धानोरी भागात गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून नायलॉन मांजाची रिळे जप्त करण्यात आली आहेत. बिबवेवाडी भागातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर परिसरात एक जण नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलीस शिपाई सुमीत ताकपेरे यांना मिळाल्यावर पोलिसांनी धाड घालून १० सहस्र रुपये किमतीची ५० रिळे जप्त केली. आदेशाचा भंग करणे, तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये अपर इंदिरानगर येथील एका तरुणाविरुद्ध सुमित ताकपेरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तर विश्रांतवाडी भागातील मुंजाबा वस्तीत नायलॉन मांजाची विक्री करणार्‍या एकाला गुन्हे शाखेने पकडून नायलॉन मांजाचे रिळ जप्त केले. गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस कर्मचारी नागेश कुंवर यांनी दिलेल्या तक्रारीवरून विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.