
मुंबई, ७ जानेवारी – गुन्हेगारी जगतातील कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा प्रमुख सहकारी दिवंगत इक्बाल मिर्ची याच्याशी संलग्न असलेली सुमारे ८४७ कोटी रुपयांची दक्षिण मुंबईतील प्रमुख संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे. गिरगावातील पठ्ठे बापूराव मार्गावरील न्यू रोशन टॉकीज येथे असलेली संपत्ती मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (पी.एम्.एल्.ए.) जप्त करण्यात आली आहे. ‘ईडी’ने डिसेंबर २०२४ मध्ये कायद्याचे कलम ८(४) लागू करून संपत्ती कह्यात घेतली. तृतीय पक्षाला संपत्ती विकण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाल्यानंतर अपीलीय न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.
१. इक्बाल मिर्चीने अमली पदार्थांची तस्करी आणि मनी लाँड्रिंगमधून मिळालेल्या पैशांचा वापर करून संपत्ती खरेदी केली. न्यू रोशन टॉकीजवरही ही कारवाई केली आहे. जप्त मालमत्तांमध्ये सदनिका, व्यावसायिक जागा आणि दक्षिण मुंबई, वरळी आणि वांद्रे येथील भूमींचा समावेश आहे.
२. ईडीने म्हटले आहे की, मिर्ची आणि त्याच्या सहकार्यांनी यांसह प्रमुख ठिकाणी मालमत्ता घेण्यासाठी शेल आस्थापने आणि बेनामी व्यवहार यांचा वापर केला. इक्बाल मिर्चीची मुले आसिफ आणि जुनैद मेमन यांनी दुबई अन् यूके येथून वडिलांच्या अवैध व्यवहारांचे व्यवस्थापन अन् विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते मालमत्तेचे कथित मालक होते.