प्रयागराज महाकुंभपर्व २०२५
प्रयागराज, ७ जानेवारी (वार्ता.) : महाकुंभपर्वात स्नानासाठी येणार्या कोट्यवधी भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. राज्य तथा केंद्रीय सुरक्षा दलाचा प्रत्येक विभाग आपापल्या परीने जनजागृती करत आहे. संगमक्षेत्री राष्ट्रीय आपत्ती प्रतिबंधक दल अर्थात् एन्.डी.आर्.एफ्.ने ठिकठिकाणी जनजागृतीपर फलक लवले आहेत. या फलकांवर चेंगराचेंगरी झाल्यास काय करावे ? आणि काय करू नये ?, यांविषयीच्या कृती दिल्या आहेत.
कुंभपर्वात सहभागी होणार्या विशाल जनसमुदायाची सुरक्षितता आणि कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत त्वरित कृती करण्यासाठी कुंभक्षेत्रात राष्ट्रीय आपत्ती प्रतिबंधक दलाची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. कुंभमेळ्यात होणार्या गर्दीचे व्यवस्थापन, गर्दी नियंत्रित करणे आणि सुरक्षित हालचाली सुनिश्चित करणे, आपत्कालीन व्यवस्थापन आणि साहाय्यकार्य, तसेच कोणत्याही अनपेक्षित घटना, चेंगराचेंगरी, आग, बुडण्याच्या घटना यांमध्ये त्वरित कृती करण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जागोजागी फलक लावण्यात आले आहेत.