पोलीस जनतेच्या रक्षणासाठी आहेत, त्यांची भीती बाळगू नका ! – कृषिकेश रावले, अप्पर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग

प्रदर्शनातून माहिती घेताना विद्यार्थी 

कुडाळ – पोलीस तुमच्या संरक्षणासाठी आहेत. त्यांची भीती बाळगू नका, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमात केले.

सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने येथील पोलीस ठाण्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाण्यात चालणार्‍या कामकाजाची माहिती जनतेला मिळावी, तसेच पोलीस यंत्रणेकडे असलेली शस्त्रे आणि पोलिसांची चौकशी यंत्रणा यांची माहिती देण्यासाठी येथे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला, तसेच शहरातील नागरिकांनीही प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली. या प्रदर्शनाचे उद्घाटन पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते झाले. या वेळी कुडाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या वेळी रावले यांनी सांगितले की, जनता आणि पोलीस यांच्यातील संवाद वाढावा, ‘सायबर’ गुन्ह्याचे प्रमाण अल्प व्हावे, तसेच मुलींवर होणारे अत्याचार अल्प व्हावेत, यासाठी पोलीस यंत्रणेने जनतेत संवाद साधण्याचे ठरवले आहे आणि त्याचाच भाग म्हणून पोलीस दलाची यंत्रणा कशाप्रकारे काम करते, याची माहिती या प्रदर्शनातून देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारे अन्याय झाला, तर ११२ या क्रमांकावर संपर्क साधा.

या वेळी पोलीस बँडचे प्रात्यक्षिक झाले. दिवसभरात तालुक्यातील विविध शाळा, नागरिक यांनी शस्त्रास्त्रे, वाहतुकीचे नियम, महिला अत्याचारांविषयीचे कायदे, ठसेतज्ञ विभागाचे कामकाज, बाँब शोधक आणि नाशक पथकाची कामगिरी यांची माहिती घेतली.