लेखक दत्ता दामोदर नायक यांच्या विरोधात गुन्हा नोंद

मंदिरे आणि मठ यांना ‘लुटारू’ संबोधल्याचे प्रकरण

लेखक दत्ता दामोदर नायक

पणजी, ७ जानेवारी (वार्ता.) – मंदिरे आणि मठ यांना ‘लुटारू’ असे संबोधून समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे गोव्यातील लेखक तथा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते दत्ता दामोदर नायक यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दत्ता दामोदर नायक यांच्या विरोधात काणकोण पोलिसांकडून भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ अंतर्गत (एखाद्या समाजाच्या धार्मिक भावना हेतुपूरस्सर दुखावणे) गुन्हा नोंद झालेला आहे. धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी दत्ता दामोदर नायक यांच्या विरोधात काणकोण, पणजी, मडगाव, डिचोली आणि वास्को या ठिकाणी यापूर्वी तक्रारी प्रविष्ट (दाखल) झालेल्या आहेत.

दत्ता नायक यांनी आमच्या संस्कृतीचा अवमान केला !

काणकोण येथे सतीश भट यांनी दत्ता नायक यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली होती. तक्रारीत सतीश भट म्हणतात, ‘‘दत्ता नायक यांनी श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ मठाच्या विरोधात अवमानकारक विधान केले आहे. दत्ता नायक यांनी मंदिर आणि मठ हे लुटारू असल्याचे म्हटले आहे. एखादा व्यक्ती देव मानणारा असू दे किंवा नसूदे, आम्ही प्रत्येकाचा सन्मान करतो; मात्र दत्ता नायक यांनी मंदिरे आणि मठ यांना ‘लुटारू’ आहेत, असे सार्वजनिक विधान करून आमच्या संस्कृतीचा अवमान केला आहे.’’

(म्हणे) ‘विधान करणे हे माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य !’ – दत्ता नायक

तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर एका राष्ट्रीय वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीशी बोलतांना दत्ता नायक म्हणाले, ‘‘विधान करणे हे माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आज तर्कशुद्ध विचारसरणी लोप पावत चालली आहे.’’ (लोकांच्या भावना दुखावणारे वक्तव्य अभिव्यक्ती स्वातंत्र्यात मोडत नाही, तर ते स्वैराचारात मोडते, हे स्वतःला साहित्यिक म्हणवणार्‍यांना कसे कळत नाही ? – संपादक)

संपादकीय भूमिका

साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला म्हणजे आपण सर्वज्ञानी झालो, असे या साहित्यिकांना वाटते. त्यामुळेच ते वाटेल ती विधाने करतात. ‘हिंदू एक अडगळ’ म्हणणारे महाराष्ट्रातील भालचंद्र नेमाडे असोत, ज्ञानेश महाराव असोत किंवा गोव्यातील दत्ता दामोदर नायक असोत, हे सर्व पुरो(अधो)गामी विचारांचे साहित्यिक एकाच माळेचे मणी ! हे कधी इस्लाम किंवा ख्रिस्ती पंथांतील अंधश्रद्धा, गैरप्रकार यांविषयी बोलायचे धाडस करत नाहीत; कारण त्यांना ‘सर तन से जुदा’ (मुंडके शरिरापासून वेगळे) होणे यांसारखे परिणाम ठाऊक असतात !