शिकागो (अमेरिका) येथील ‘सुरभि एन्सेम्बल’ या वाद्यवृंद कलाकारांची ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधन केंद्राला भेट !

‘सुरभि एन्सेम्बल’ या वाद्यवृंदामधील कलाकार

फोंडा, ७ जानेवारी (वार्ता.) – शिकागो (अमेरिका) येथील ‘सुरभि एन्सेम्बल’ या वाद्यवृंदातील १० कलाकारांनी ६ आणि ७ जानेवारी या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्राला भेट दिली. ‘सुरभि एन्सेम्बल’ हा वाद्यवृंद गेल्या ८ वर्षांपासून आंतर सांस्कृतिक कलांच्या प्रस्तुतीकरणाचे कार्य करत आहे. त्यांचे डिसेंबर २०२४ पासून भारतातील विविध राज्यांमध्ये कार्यक्रम चालू आहेत.

१. ‘सुरभि एन्सेम्बल’च्या भारत दौर्‍याच्या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क आणि त्यांची पत्नी सौ. श्वेता क्लार्क यांनी कलाकारांची भेट घेऊन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने आतापर्यंत गायन, वादन, नृत्य अन् नाट्य या विविध क्षेत्रांत केलेल्या आध्यात्मिक संशोधनकार्याची माहिती दिली.

२. संशोधन केंद्रामध्ये या वाद्यवृंदाच्या ८ कलाकारांनी त्यांच्या कलेचे सादरीकरण केले. या कार्यक्रमामध्ये स्पॅनिश फ्लेमिंको, मक्सिकन फोक, भरतनाट्यम्, कथ्थक, कालबेलीया इ. विविध देशांतील नृत्यप्रकारांचा समावेश होता.

३. कार्यक्रमाच्या शेवटी ‘सुरभि एन्सेम्बल’च्या वतीने त्यांच्या सदस्या सौ. किन्नरी वोरा यांचा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते श्री सरस्वतीदेवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

४. या कार्यक्रमाचे आयोजन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या समन्वयक कु. तेजल पात्रीकर आणि नृत्य अभ्यासिका सौ. सावित्री इचलकरंजीकर यांनी केले.

५. ‘सुरभि एन्सेम्बल’च्या कलाकारांच्या २ दिवसांच्या वास्तव्यात ‘स्पॅनिश फ्लेमिंको’ आणि ‘मॅक्सिकन फोक’ विदेशी नृत्यप्रकारांचाही महर्षि अध्यात्म विश्वविद्यायलयाच्या वतीने संशोधनात्मक अभ्यास करण्यात आला.

६. ‘सुरभि एन्सेम्बल’च्या कलाकरांनी बोलतांना आणि संशोधन केंद्र बघतांना आध्यात्मिक साधनेविषयी जिज्ञासेने विविध प्रश्न विचारले. काही जण साधनेबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक होते.

‘सुरभि एन्सेम्बल’ वाद्यवृंदाची स्थापना, उद्देश आणि कार्य

‘सुरभि एन्सेम्बल’ हे वाद्यवृंद  गायन, वादन आणि नृत्य यांच्या माध्यमातून विविध संस्कृतींमधील एकमेकांशी असलेला संबंध त्यांच्या कार्यक्रमातून प्रदर्शित करतात. या वाद्यवृंदातील कलाकार विविध संस्कृतींच्या कलाप्रकारांचे प्रतिनिधित्व करतात. ‘सुरभि एन्सेम्बल’ची स्थापना शिकागो (अमेरिका) येथे भारतीय वंशाच्या वीणावादक सरस्वती रंगनाथन् यांनी केली. ‘सुरभि एन्सेम्बल’ या प्रयोगजीवी समूहाचा उद्देश विविध सांस्कृतिक कलांचे प्रस्तुतीकरण करणे, त्यांचा अभ्यास करून त्यांतील साधर्म्य शोधणे, विचारांचे आदानप्रदान करणे आणि वैश्विक एकात्मता साधणे हा आहे. ‘एक रंगमंच, एक संगीत आणि एक समाज’ (One stage, One music, One community) असे या वाद्यवृंदाचे ब्रीदवाक्य आहे. ‘सुरभि एन्सेम्बल’ने आतापर्यंत अनेक शाळा, रुग्णालये, उद्याने, सांस्कृतिक केंद्रे येथे कलांचे प्रस्तुतीकरण केले आहे. भारतासह त्याने आतापर्यंत व्हिएतनाम, स्पेन, पोर्तुगाल, मेक्सिको अशा अनेक देशांचे दौरे केले आहेत.