दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : १ एप्रिलपासून सर्व वाहनांना ‘फास्ट-टॅग’ अनिवार्य !; डोंबिवलीत दूषित पाणी !…

१ एप्रिलपासून सर्व वाहनांना ‘फास्ट-टॅग’ अनिवार्य !

मुंबई – राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत सर्व वाहनांना १ एप्रिलपासून ‘फास्ट-टॅग’ अनिवार्य करण्याचा मुख्य निर्णय ७ जानेवारी या दिवशी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.


डोंबिवलीत दूषित पाणी !

डोंबिवली – येथील पश्चिमेतील सुभाष रस्त्यावरील क्रांती व्यापारी संकुल, नवापाडा, सुभाष रस्ता ते चिंचोड्याचापाडा, कुंभारखाणपाडा भागात काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत आहे. या दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने याविषयी पालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

संपादकीय भूमिका : स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही दूषित पाण्याचा पुरवठा होणे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पदच !


अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत !

डोंबिवली – ऑक्टोबर २०२४ मध्ये डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत ३२ वर्षांच्या संदीप कुमार याने एका अल्पवयीन मुलीला मिठाईमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बळजोरीने लैंगिक अत्याचार केला होता. नंतर तो उत्तरप्रदेशात पळून गेला. पोलिसांनी त्याला तेथून अटक केली. त्याने मिठाईमध्ये गुंगीचे औषध घालून मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते, तसेच याविषयी सांगितल्यास भावाला ठार मारण्याची धमकी दिली होती.


माथेफिरूने महाविद्यालयीन तरुणीचे केस कापले

दादर – येथे एका माथेफिरूने महाविद्यालयीन तरुणीचे केस कापले आणि ते बॅगेत भरून तेथून पळ काढला. तरुणीने त्याचा पाठलाग करत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला; पण गर्दी असल्याने तो पळून गेला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.


लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी दांपत्याची आत्महत्या !

नागपूर – येथे लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी पती-पत्नीने आर्थिक परिस्थितीला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. याआधी त्यांनी व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवले होते. त्यांनी लग्नाचे कपडे परिधान केले होते. जारील उपाख्य टोनी ऑस्कर मॉनक्रिप आणि पत्नी ॲनी जारील मॉनक्रिप अशी त्यांची नावे आहे. त्यांचा प्रेमविवाह झाला होता. नोकरी आणि अपत्यप्राप्ती नसणे यांमुळे ते कंटाळले होते. अंत्यविधीसाठी घरात ७५ सहस्र रुपये ठेवले आणि चिठ्ठीत नातेवाईकांची क्षमा मागितली.