शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीचे संकेतस्थळ १५ दिवसांपासून बंद !

मुंबई – नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी, त्यातील नावे न्यून-अधिक करण्यासाठी यापूर्वी अनेकदा महानगरपालिकेत हेलपाटे घालावे लागत असत. नागरिकांची होणारी ही परवड थांबवण्यासाठी अन्नधान्य पुरवठा विभागाने शिधापत्रिकेची प्रक्रिया ऑनलाईन केली आहे; मात्र मागील २ आठवड्यांपासून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (आर्.सी्.एम्.एस्.)चे संकेतस्थळ बंद आहे. त्यामुळे सहस्रो अर्ज आणि प्रकरणे प्रलंबित आहेत.

१. नवीन शिधापत्रिका काढणे, नावे चढवणे, न्यून करणे, विभक्त करणे अशा विविध कामांसाठी नागरिक महापालिकेच्या सेतू कार्यालयात येतात. काही वेळा दिलेल्या मुदतीत शिधापत्रिका मिळत नाहीत, तर काही वेळा दलालाकडून नागरिकांची आर्थिक लूट होते. हे प्रकार थांबवण्यासाठी शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे; मात्र गेल्या २ आठवड्यांहून अधिक काळ शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीचे संकेतस्थळ बंदच आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांची ऑनलाईन स्वरूपात होणारी कामे रखडली आहेत.

२. या संकेतस्थळाच्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर तक्रार दिली आहे. ‘शासनाने वरिष्ठ स्तरावरून यावर निर्णय घेऊन लवकरात लवकर संकेतस्थळ चालू करावे’, असे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले.

३. शिधापत्रिकांची कामे ऑनलाईन केली आहेत; मात्र त्याचे वरिष्ठ स्तरांवरून नियोजन होत नसल्याने संकेतस्थळ बंद पडते, तर कधी चालतच नाही. त्यामुळे कामे होत नाहीत. त्यामुळे ऑफलाईन होते, तेच बरे होते, अशी तक्रार शिधापत्रिकाधारकांनी केली आहे.

संपादकीय भूमिका :

सरकारी कामे म्हणजे आधीच वेळखाऊ प्रक्रिया झाली आहे. त्यात आता संगणकीय अडचणींचे निमित्त मिळाले आहे. संगणकीय प्रणालीच एवढे दिवस प्रलंबित रहाणार असेल, तर प्रशासनाचे संगणकीकरण करण्याचा काय उपयोग ?