नांदणी येथील जैन मठाला आवश्यक सोयी-सुविधांसह तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देणार ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांना ‘प्रजागर्क’ पदवी देतांना मुनीवर, तसेच विविध मान्यवर

कोल्हापूर – जैन समाजात व्यवसाय आणि व्यापार यांत देशासाठी योगदान देणारे लोक आहेत. ते नागपूर येथे भेटले अन् कोल्हापूर जिल्ह्यात काळ्या आईची सेवा करणारे शेतकरी लोक भेटले. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ, नांदणीला लवकरच तीर्थक्षेत्र ‘अ’ दर्जा देऊन मठासाठी आवश्यक सोयीसुविधा देऊ, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते मठातील आयोजित पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सव सोहळ्यात बोलत होते.

या वेळी जैन समाजातील आचार्य विशुद्ध सागर महाराज, मठाधिपती, १० आचार्य महाराज, ७ मुनी महाराज, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर, आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, जैन अल्पसंख्यांक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांना सकल जैन समाज आणि स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ यांच्या वतीने ‘प्रजागर्क’ पदवी देण्यात आली. नांदणी येथे ७४३ गावांचे अधिपत्य असलेल्या स्वस्तिश्री जिनसेन मठ येथे १२ वर्षांनंतर महामस्तिकाभिषेक सोहळ्याचे आयोजन १ ते ९ जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे.

आलमट्टीविषयी आवश्यकता भासल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ ! – मुख्यमंत्री 

कर्नाटक येथील आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या संदर्भात महाराष्ट्र सरकार लक्ष ठेवून आहे. त्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे. शासनाचा प्रयत्न पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आहे. त्यासाठी आवश्यकता भासल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ.