सिंधुदुर्गनगरी – जनतेला जागृत करणे आणि तिची निर्णयक्षमता वाढवण्यात पत्रकार आणि प्रसारमाध्यमे यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. शासन आणि पत्रकार यांच्यामध्ये संवादाची भूमिका राहिली पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. व्यक्तिगत द्वेष न ठेवता पत्रकारांनी लिखाण करावे, असे वक्तव्य मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी ६ जानेवारी या दिवशी येथे झालेल्या पत्रकार दिन सोहळ्यात बोलतांना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकारसंघाच्या वतीने सिंधुदुर्गनगरी येथील ‘आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक भवन’ येथे मराठी पत्रकार दिनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री राणे बोलत होते. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून भाजपचे नेते माधव भांडारी, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, जिल्हा पत्रकारसंघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आणि पत्रकारसंघाचे पदाधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अन्य मान्यवरांनीही विचार व्यक्त केले.
मंत्री राणे पुढे म्हणाले की, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. जिल्ह्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते शोधण्यासाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी शोध पत्रकारिता करावी. व्यक्तीला महत्त्व न देता विकासाला प्राधान्य देणारे लिखाण करावे. अन्य जिल्ह्यांतील पत्रकार त्यांच्या भागाला महत्त्व देणारे आणि विकास साधणारे लिखाण करतात. त्याचे अवलोकन करून लिखाण करावे.
यापुढे जिल्ह्यात पत्रकार दिनाचा एकच कार्यक्रम
या वेळी मंत्री राणे म्हणाले, ‘‘पुढील वर्षापासून जिल्ह्यात एकच पत्रकार दिन साजरा होईल. बाळशास्त्री जांभेकर यांच्या देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या जन्मगावी होणार्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना मानाचे स्थान मिळेल. येथे कुणावरही अन्याय होणार नाही. त्यामुळे या गावाचे महत्त्व भविष्यात वाढेल. केंद्र आणि राज्य सरकार एकाच विचारांची आहेत. त्यामुळे येत्या ५ वर्षांत विकास झाला पाहिजे. यासाठी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचे मला सहकार्य हवे आहे.’’
या पत्रकारांचा झाला गौरव
या वेळी रमेश जोगळे यांना ‘ज्येष्ठ पत्रकार’, वैभव साळकर, दत्तप्रसाद वालावलकर, कृष्णा ढोलम, सचिन लळीत, भरत सातोसकर, हरिश्चंद्र पवार, काशीराम गायकवाड आणि मारुति कांबळे या पत्रकारांचा ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम, असे या पुरस्काराचे स्वरूप होते.